ऑक्सफर्ड लसीच्या चाचण्यांना ब्रेक : ब्रिटनमधील स्वयंसेवकावर साईडइफेक्ट दिसल्याने गोंधळ
लंडन / वृत्तसंस्था
कोरोनाविरोधातील लढय़ात प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात जास्त अपेक्षा असणाऱया ऑक्सफर्डच्या एझेडडी-1222 या लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी तात्पुरत्या कालावधीसाठी थांबवण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची कोरोना लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यानंतर कोरोना लसीची तिसऱया टप्प्यातील चाचणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना व्हायरस संकटादरम्यान, अमेरिकेची एस्ट्राजेनेका कंपनी लवकरच खुषखबर देणार होती, मात्र, सध्यातरी जगाला एक मोठा धक्का बसला आहे. एस्ट्राजेनेकाने आपला अंतिम टप्पा थांबवला आहे. एस्ट्राजेनेका औषध मानवी परीक्षणात सहभागी झालेला एक स्वयंसेवक आजारी पडल्यानंतर औषधाची चाचणीच सर्वत्र थांबवण्यात आली. दरम्यान, एस्ट्राजेनेकाने एका वक्तव्य जारी करत हा एक सर्वसामान्य अडथळा आहे. परीक्षणात केवळ एका व्यक्तीच्या आजाराबाबत जास्त काही माहिती मिळालेली नाही. याचे व्यवस्थित अवलोकन केल जाईल आणि त्यानंतर पुन्हा चाचणी सुरू केली जाईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
हेल्थ न्यूज वेबसाइट स्टेट न्यूजच्या रिपोर्टनुसार, ट्रायलमध्ये भाग घेणाऱया एका स्वयंसेवकामध्ये औषधाचे संशयास्पद गंभीर प्रतिकूल परिणाम दिसून आल्यानंतर अंतिम टप्प्यातील चाचणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत औषध विकसित करणारी कंपनी एस्ट्राजेनेका कोविड-19 वॅक्सीन जागतिक रेसमध्ये सर्वात पुढे आहे.
वैद्यकीय मानक पुनरावलोकन प्रक्रियेमुळे औषधाच्या सुरक्षा माहितीचे पुनरावलोक करण्यासाठी लसीची चाचणी थांबवण्यात आली आहे. अभ्यासात ब्रिटनसह विविध ठिकाणांवर एस्ट्राजेनेका आणि युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या संशोधकांद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या कोविड-19 औषधाचे परीक्षण होत आहे, याठिकाणी प्रतिकूल घटनेची माहिती मिळाली होती, असे एस्ट्राजेनेकाच्या प्रवक्त्याच्या एका संदर्भाने अहवालामध्ये स्पष्ट केले आहे. मात्र, साईड इफेक्ट्स कशाप्रकारचे होते आणि वॅक्सीनची प्रतिकूल प्रतिक्रिया केव्हा दिसून आली, याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही. तरीही ज्या स्वयंसेवकांवर औषधाची चाचणी केली गेली आहे, ते रिकव्हर होतील, असा दावा करण्यात येत आहे.
वैद्यकीय व्यवस्थेवर परिणाम
कोरोना वॅक्सीनची ट्रायल रोखल्याने अन्य एस्ट्राजेनेका वॅक्सीनची चाचणी प्रभावित झाली आहे. सोबतच वॅक्सीन निर्मार्त्यांकडून करण्यात येत असलेली क्लिनिकल ट्रायलसुद्धा प्रभावित झाली आहे. आता ते सर्वजण अशा संकेतांच्या शोधात असतील, जेणेकरून योग्य प्रभाव समजून घेता येतील.
वातावरण भीतीदायक
मोठय़ा परीक्षणांमध्ये योगायोगाने व्यक्ती आजारी पडली असेल, परंतु याकडे लक्ष देऊन स्वतंत्रपणे पुनरावलोकन केले जाणार आहे. गंभीर प्रतिकूल प्रतिक्रिया वेगवेगळय़ा असतात आणि यामध्ये ते मुद्दे सहभागी केले जाऊ शकतात. संबंधिताला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागू शकते, धोकादायक आजार होऊ शकतात आणि मृत्यूसुद्धा होऊ शकतो. अशापद्धतीच्या शक्यतांमुळे सध्या वातावरण भीतीदायक बनले आहे.
निर्धार कायम
सध्या एस्ट्राजेनेकाने अजूनपर्यंत यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, प्रयोगात्मक वॅक्सीनसाठी शास्त्रीय सुरक्षा आणि प्रभावीकारक मानके कायम ठेवण्याचा संकल्प केला आहे. सध्या कोरोना संसर्ग वाढत असल्याने औषधची तातडीने गरज आहे, पण आम्ही याची मानके आणि प्रभावाशी तडजोड करणार नाही. प्रत्येक प्रकारे तपासणी केल्यानंतरच वॅक्सीनला मंजुरी देऊ. कोरोना वॅक्सीन बनवण्याच्या रेसमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन, मर्क अँड कंपनी, मॉडर्ना इंक, नोवावेक्स इंक, सनोफी, फिजर, ग्लॅक्सोस्मितक्लीन, बायोनेट इत्यादींचा समावेश आहे.
भारतातील चाचण्यांवर परिणाम नाही : पुनावाला
भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचणीमध्ये असे काहीही गंभीर आढळून आलेले नाही, असे सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी बुधवारी स्पष्ट केले. ब्रिटनमधील प्रकाराचा भारतात सिरम इन्स्टिटय़ूटकडून सुरु असलेल्या मानवी चाचण्यांवर परिणाम होणार नाही. ब्रिटनमधल्या व्यक्तीवर जी रिअ?Ÿक्शन झाली त्याचा थेट लसीशी संबंध नाही. ज्या व्यक्तीवर रिअ?Ÿक्शन झाली, त्याला आधीपासून काही न्युरोलॉजिकल समस्या होती. लस चाचणीमध्ये अशा घटना होतात, असेही ते पुढे म्हणाले.