अद्याप सर्वसामान्य जनतेला लस देण्यास प्रारंभ नाही : घाईगडबडीत लसीची घोषणा केल्याने सरकारची कोंडी
वेगाने फैलावत चाललेल्या कोरोनाचे संकट रोखण्यासाठी जगात सर्वात पहिल्यांदा रशियाने लस विकसित केली. वैद्यकीय चाचणी पूर्ण करण्याआधीच 11 ऑगस्टला लसीसंबंधीची घोषणा केली असली तरी अद्यापही महिना उलटून गेला तरी सर्वसामान्य लोकांना लस देण्यास प्रारंभ झालेला नाही. प्रत्यक्ष लसीकरणास प्रारंभ न झाल्याने जगभरातून या लसीच्या प्रभावाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रशियाने लस आणल्याची घोषणा केल्यानंतर भारतासह अनेक देशांनी संबंधित कंपनीशी करार करत ऑर्डरही नोंदवली. मात्र, पश्चिमी देशांनंतर आता खुद्द देशवासीयच या लसीबाबत साशंक असल्याने रशियाची भविष्यात चांगलीच कोंडी होऊ शकते.
रशियाने मागील महिन्यातच कोरोनावर लस विकसित केल्याचा दावा केला आहे. स्फुटनिक-5 असे त्या लसीचे नामकरणही करण्यात आले आहे. या लसीच्या निर्मिती आणि वितरणासाठी त्यांनी अनेक कंपन्यांशी करारही केले आहेत. आपण संशोधन केलेली लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा रशियाकडून करण्यात येत होता. मात्र, आता रशियातच या लसीच्या प्रभावाबाबत साशंकता असल्याचे दिसून येत आहे. या लसीची घोषणा घाईगडबडीत करण्यात आल्याची जाणीव रशियाला झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजूनही या लसीची मर्यादित निर्मिती करण्यात येत असून फक्त चाचण्यांसाठी त्याचा वापर होत आहे. तसेच अद्याप नागरिकांना याचे लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत लसीची निर्मिती वाढवण्यात येईल आणि नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात येईल, असे लसीची घोषणा करताना रशियाने स्पष्ट केले होते. मात्र, अजूनही या लसीचे मर्यादित स्वरूपात उत्पादन सुरू आहे. त्यामुळे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वैद्यकीय चाचणी व्यतिरिक्त इतरांना अद्याप लस देण्यात आली नसल्याचे आरोग्य तज्ञांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना लस देण्यापूर्वी लसीच्या प्रभावाबाबत पुन्हा एकदा विचार करण्यात येत असल्याची शक्मयता तज्ञांनी वर्तवली आहे.
मॉस्कोमध्ये लसीच्या तिसऱया टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. त्यात 30 हजार जणांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी ही लस फक्त वैद्यकीय चाचण्यांमध्ये सहभागी असणाऱयांनाच देण्यात येत असल्याचे आरोग्य तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
अजून उत्पादनही मर्यादित
लसीकरण सुरू न झाल्याने सध्या या लसीचे मर्यादित उत्पादन केले जात आहे. ही लस सध्या तरी फक्त वैद्यकीय चाचणीपर्यंत मर्यादित ठेवावी. याचा प्रभाव आणि सुरक्षिततेची पूर्ण खात्री झाल्यावर मोठय़ा प्रमाणात निर्मिती करावी, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
रशियन आरोग्यमंत्र्यांकडून शस्त्रक्रियेऐवजी ‘मलमपट्टी’
रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी काही प्रांतामध्ये लसीचे नमुने पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे. मात्र, लसीबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. तसेच जनतेला लस कधी देण्यात येईल, याचीही माहिती त्यांनी दिलेली नाही. त्यांच्या या माहितीवरून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करण्याऐवजी ते केवळ ‘मलमपट्टी’ करत असल्याचेच दिसून येते. डॉक्टर, आरोग्य सेवक, आजारी, वृद्ध आणि शिक्षकांना कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असल्याने त्यांना सर्वात आधी लस देण्यात येईल, असे आरोग्यमंत्री मुराश्को यांनी सांगितले होते. मात्र, वितरण प्रणाली आणि आरोग्य सेवकांच्या प्रशिक्षणांमुळे लस देण्याचे काम मर्यादित स्वरुपात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनामुक्तांच्या संख्येत भारत जगात अग्रेसर
भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना विषाणू या महामारीचा कहर वाढत चालला आहे. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा हा 3 कोटींवर गेला आहे. यासोबतच कोरोनामुक्तांचा आकडाही वाढत आहे. भारतात दररोज 90 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होत असली तरी कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांचा आकडा देखील भारतात सर्वाधिक आहे. जगभरात भारत याबाबतीत अग्रेसर आहे.
सोमवारपर्यंत भारतात 43 लाख 96 हजार 399 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात कोरोनामुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येपैकी भारताची आकडेवारी 19 टक्के आहे. कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये भारताने अमेरिकेला देखील मागे टाकले आहे. वर्ल्डोमीटरद्वारे जाहीर केलेल्या आकडय़ानुसार, भारतानंतर अमेरिकेचा रिकव्हरी रेट 18.70 टक्के आहे. यानंतर ब्राझील देशाचा रिकव्हरी रेट हा 16.90 टक्के इतका आहे. त्यानंतर रशिया आणि दक्षिण आफ्रिका देश असून त्यांचा रिकव्हरी रेट अनुक्रमे 4 टक्के आणि 2.60 टक्के इतका आहे.
फ्रान्स : दिवसात 10,569 पॉझिटिव्ह
फ्रान्समध्ये सोमवारपर्यंतच्या अखेरच्या 24 तासांत देशात 10 हजार 569 नवीन रुग्ण आढळले. रविवारी 13 हजार 498 रुग्ण सापडले होते. फ्रान्समध्ये सध्या संक्रमणाची दुसरी लाट पसरली असून सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. रविवारी आणखी 12 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. फ्रान्समध्ये आतापर्यंत 31 हजार 285 लोकांचा मृत्यू झाला आहे.
न्यूझीलंड : संसर्ग आटोक्यात
न्यूझीलंडमध्ये सोमवारी नवीन रुग्ण आढळले नाहीत. ऑकलंडमध्ये विशेषत: निर्बंधासह दक्षतेचा वापर केला जात आहे. येथे अजूनही बरेच पर्यटक असल्यामुळे प्रतिबंधित उपाययोजना कायम ठेवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत शासनाने उचललेली पावले आणि लोकांनी काय केले पाहिजे याची माहिती दिली.
चीन : 12 नवीन रुग्ण
पुन्हा एकदा चीनमध्ये 12 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्व रुग्ण इतर देशांमधून चीनमध्ये पोहोचलेले असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने दिली आहे. तसेच संसर्गाची कोणतीही चिन्हे न आढळलेले 25 संशयित रुग्ण अलगीकरणात असल्याचे सांगण्यात आले. परदेशातून येणाऱयांसाठी चीनने नवी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे.
ब्रिटन : नियम कडक
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकतीच देशात कोरोनाशी संबंधित नवीन निर्बंधांची घोषणा केली. देशात संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली आहे. लोक सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करीत नसल्यामुळे आता निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतरही अलगीकरणात न राहणाऱया व्यक्तींना येथे 13 हजार डॉलर्स (सुमारे 9.56 लाख रुपये) दंड आकारला जाणार आहे. याप्रकरणी 30 लोकांना अटकही झाली आहे.