अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 31 डिसेंबर 2021, सकाळी 11.30
● जिल्ह्यात नोव्हेंबर, डिसेंबरमधे अल्प रूग्णवाढ
● 2022 जिल्हा कोरोनामुक्तीचा निर्धार
● थर्टी फस्टच्या पार्श्वभुमीवर बंदोबस्त
● शुक्रवारी डिसेंबरमधील सर्वाधिक 48 रूग्ण वाढले
● पॉझिटिव्हीटी रेटही 1.89 वर पोहचला
प्रतिनिधी / सातारा :
सन 2020 आणि सन 2021 च्या कोरोना लाटेच्या आठवणी पुसट करत जिल्हावासिय उद्या नव्या वर्षात प्रवेश करत आहेत. सन 2021 च्या डिसेंबर महिन्यात कोरोना अगदीच आटोक्यात ठेवत 31 डिसेंबरची पहाट उगवली. कोरोनाच्या वाढत्या वेगावर नियंत्रण ठेवतानाच ओमिक्रॉनलाही जागेवरच संपवून जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे. सध्य स्थितीत जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकही ओमिक्रॉन बाधित रूग्ण नाही. मात्र तरीही अधिकची काळजी म्हणून जिल्ह्यात आज थर्टी फस्टच्या पार्श्वभुमीवर कडक बंदोबस्त सुरू झाला आहे. शुक्रवारी सातारा, फलटण, वाई, कराडसह महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील बंदोबस्ताचा आढावा जिल्हा पोलीस दलाने घेतला आहे. दरम्यान शुक्रवार 31 डिसेंबर 2021 रोजी सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने 48 रूग्णांची वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यातील ही सर्वात जास्त वाढ आहे.
नोव्हेंबर, डिसेंबरने जिल्हा सावरला
सन 2020 साली आलेल्या कोरोनाच्या लाटेपेक्षा सरत्या वर्षात कोरोनाने सातारा जिल्ह्याला बेजार करून सोडले. वाढत्या रूग्णसंख्येमुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणाही कोलमडून पडली. मात्र प्रशासन आणि जिल्हावासियांच्या संयमाने सप्टेंबर महिन्यापासून कोरोनाच्या आलेखाला उतरती कळा लागली. आक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात हा आलेख आणखी घसरला. डिसेंबर महिन्यात तर जिल्ह्यात पाचपेक्षा अधिका तालुक्यांनी अपवाद वगळता कोरोनाला हद्दपार करून टाकले. मात्र आज शुक्रवारी आलेल्या अहवालात दुप्पट 48 रूग्णवाढ झाली आहे.
नव्या वर्षाची सकारात्मक चाहूल
राज्यात ओमिक्रॉनची रूग्णसंख्या वाढत असतानाच सातारा जिल्ह्यात ओमिक्रॉनला एन्ट्री झाल्या झाल्याच संपवण्यात यश आले. तीन ओमिक्रॉनबाधित रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या सहकार्यामुळे आणि जिल्हा प्रशासनाच्या ट्रेसिंग, टेस्टिंगमुळे जिल्हा सध्यस्थितीत ओमिक्रॉनपासून दूर आहे. पुणे जिल्ह्यात मात्र रूग्णसंख्या वाढत असल्याने नव्या वर्षात जिल्हावासियांना काळजी घ्यावी लागणार आहे. नव्या वर्षाची सकारात्मक सुरूवात करताना मास्कचा वापर अनिवार्य ठरेल.
गुरूवारी जिल्हय़ात
नमुने-2534
बाधित-48
मृत्यू-00, उशिरा नोंद -00
उपचारार्थ-202
मुक्त-14
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
नमुने-23,67,629
बाधित-2,52,413
मृत्यू-6,498
मुक्त-2,44,989