संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसांचे नुकसान होण्याचा धोका : संबंधित चाचणीतून मिळणार अचूक माहिती
कोरोना महामारीला जवळपास 11 महिने होत आले असून लोकांनी यापासून वाचण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग अवलंबिले आहेत. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आहार आणि कसरतींवरही लोक विशेष लक्ष देत आहेत. कोरोना विषाणूचा लोड वाढल्यास फुफ्फुसांना नुकसान होण्याचा धोकाही वाढतो, यामुळे रक्तात प्राणवायूची पातळी घटते. ही स्थिती कोरोनात्तर समस्यांचे कारण ठरत आहे. याचमुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी ब्लड गॅस टेस्ट करवून घेणे आवश्यक आहे. विशेषकरून विषाणूचा लोड अधिक असलेल्यांनी ही चाचणी करवून घेणे क्रमप्राप्त असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
ब्लड गॅस टेस्ट
या चाचणीद्वारे शरीरात प्राणवायू आणि कर्बवायूच्या पातळीचा उलगडा होता. फुफ्फुसे आणि यकृत योग्यप्रकारे काम करत आहे की नाही हे यातून डॉक्टरांना समजू शकते. रक्तपेशी शरीरात प्राणवायू आणि कर्बवायूच्या वहनाचे काम करतात. हे कार्य फुफ्फुसांद्वारेच होऊ शकते. ब्लड गॅस टेस्टमध्ये फुफ्फुसे रक्तात प्राणवायूचा किती पुरवठा करत आहेत हे समजून येते. तसेच फुफ्फुसे किती प्रमाणात कर्बवायू बाहेर टाकतात आहेत हेही स्पष्ट होते. चाचणीनंतर जर रक्तात प्राणवायू आणि कर्बवायूची पीएच लेवल कमी आढळल्यास याचा अर्थ फुफ्फुसे पूर्ण क्षमतेने काम करत नसतात. पीडिताला मूत्रपिंड, हृदयाची समस्या किंवा शर्करापातळी वाढल्यानेही असे घडू शकते.
आवश्यकता का?
श्वास घेण्यास त्रास, अस्वस्थपणा यासारखी लक्षणे असल्यास ब्लड गॅस टेस्ट करवून घ्यावी. अशा लक्षणांमागे अनेक कारणे असू शकतात. परंतु कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींमध्ये ही लक्षणे दिसून येत असल्यास याचे कारण फुफ्फुसांना झालेले नुकसान असू शकते. अशा स्थितीत निष्काळजीपणा पत्करता येत नाही.
रक्तातील पीएच पातळी
मानवी रक्तात अनेक प्रकारचे वायू आढळून येतात. यांची पातळी सर्वसाधारणपेक्षा अधिक किंवा कमी झाल्यास रक्तातील पीएच पातळी बिघडते. याचमुळे माणसाची रोगप्रतिकारकशक्ती अत्यंत कमकुवत होते. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये अशाप्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. याचमुळे डॉक्टर आणि तज्ञ कोरोनानंतर ब्लड गॅस टेस्ट आवश्यक असल्याचे सांगत आहेत.
फुफ्फुसांवर सर्वाधिक आघात
कोरोना विषाणूने संक्रमित व्यक्तींमध्ये विषाणूचा लोड अधिक असल्यास त्यांच्या फुफ्फुसांना नुकसान होण्याचा धोका असतो. याचमुळे रोगप्रतिकारक्षमता कोलमडून पडते. रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत झाल्याने शरीर कोरोनासमवेत अन्य विषाणूंशी लढण्यास सक्षम राहत नाही. याचमुळे फुफ्फुसेही कमकुवत होतात आणि यातून श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.