प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा विस्फोट झाला असून बाधितांना उपचारासाठी बेड मिळणे मुष्किल झाले आहे. यामध्येच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जिल्हा रुग्णालयातील कोविड केंद्रात 10 टक्के बेड्स राखून ठेवावेत, असा आदेश राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने दिला आहे.
राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवांचे सचिवांनी राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा ऍटर्नी, सर्व जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या अधिकाऱयांना याबाबत आदेश दिला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाली असून सरकारकडून कोरोना नियंत्रणासाठी विविध पावले उचलली जात आहेत. दरम्यान, जिल्हय़ातील आरोग्य खात्यात सेवा बजावत असलेल्या डॉक्टर, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जिल्हा कोविड रुग्णालयात 10 टक्के बेड राखीव ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.