ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी 4.30 वाजता उच्चस्तरीय आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यासह अन्य मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत वाढती कोरोना रुग्णसंख्या, लसीकरण आणि उपाययोजना यावर चर्चा होणार आहे. बैठकीनंतर केंद्रीय पातळीवर कोणते निर्णय घेतले जातात याकडे देशाचे लक्षाचे लागून राहिले आहे.
देशातील अनेक राज्यांनी कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत, तरी देखील संसर्ग वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात 1,59,632 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 40,863 रुग्ण बरे झाले तर 327 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 5,90,611 झाली आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी ही आढावा बैठक बोलावली आहे.