पाच सरकारी तर तीन खासगी इस्पितळांचा समावेश
प्रतिनिधी/ पणजी
गोवा सरकारने कोरोना लसीकरणासाठी आठ इस्पितळे निश्चित केली आहेत. आठ इस्पितळात एकूण 18 हजार आरोग्य सेवा कर्मचाऱयांना पहिल्या टप्प्यात लसी दिली जाणार आहे. प्रत्येक इस्पितळात दरदिवशी 100 जणांचे असे आठ इस्पितळांतून दिवसाला 800 जणांचे लसीकरण केले जाणार असल्याचे राज्य इम्युनायझेशन अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लसीकरणासाठी निश्चित केलेल्या बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळ, मडगाव येथील हॉस्पिसीयो, म्हापसा येथील जिल्हा इस्पितळ, चिखली आरोग्य केंद्र, तसेच फोंडा येथील उपजिल्हा हॉस्पिटल यांचा समावेश आहे. खाजगी इस्पितळांमध्ये दोनापावल येथील मणिपाल हॉस्पिटल, ओल्ड गोवा येथील हेल्थवे हॉस्पिटल व मडगाव येथील व्हिक्टर हॉस्पिटल यांचा समावेश आहे.
लसीकरणानंतर होणार परीक्षण
आरोग्य सचिव अमित सतिजा यांच्या नेतृत्वाखाली राज्य कृती दल स्थापन करण्यात आले आहे. लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरु करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यात देशभरातील तीन कोटी आरोग्य सेवा कर्मचाऱयांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या आरोग्य सेवा कर्मचाऱयांचे लसीकरण केले जाईल त्यांचे अतिरिक्त परिणामासाठी परीक्षण केले जाईल, असे डॉ. बोरकर यांनी सांगितले.
आज राज्य कृती दलाची पुनरावलोकन बैठक
आज सोमवार 11 रोजी राज्य कृती दलाने पुनरावलोकन बैठक आयोजित केली असून त्यात विशेष अधिकारी, आठ हॉस्पिटलांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. या बैठकीत लसीकरण मोहिमेबाबत सखोल चर्चा केली जाणार आहे. लसीकरणाच्या तयारीसाठी राज्यात दोन वेळा मॉक ड्रील करण्यात आले आहे. शनिवारी राज्यात 81 कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले असून राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या एकूण 51 हजार 790 वर पोचली होती त्यातून 50 हजार 177 जण कोरोनामुक्त झालेल आहेत. मात्र 746 जणांचा मृत्यू झाला आहे.