दिल्लीतील ‘एम्स’मध्ये 30 वर्षीय स्वयंसेवकाला दिला पहिला डोस : भारत बायोटेक कंपनीकडून ‘कोवॅक्सिन’ची निर्मिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूवर प्रभावी लस काढण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत असतानाच देशवासियांसाठीही अखेर शुभवार्ता मिळाली. भारतात विकसित करण्यात आलेल्या कोवॅक्सिन या लसीच्या मानवी चाचणीला एम्स रुग्णालयात शुक्रवारी सुरुवात झाली आहे. एका 30 वषीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला. भारत बायोटेक या फार्मा कंपनीने ही कोरोना विषाणूवरील पहिली स्वदेशी लस तयार केली आहे.
कोरोनावर प्रभावी लस तयार करण्याचा प्रयत्न जगभरात अनेक देश करत आहेत. ब्रिटनसह काही देशांमध्ये लसीची मानवी चाचणी करण्यात आली आहे. आता त्यात भारतानेही सकारात्मक मार्गक्रमण करत लसीची मानवी चाचणी सुरू केली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोना लसीची चाचणी सुरू झाली आहे. आयसीएमआरने देशभरात कोवॅक्सिनच्या वैद्यकीय चाचणीसाठी निवडलेल्या 12 ठिकाणांपैकी दिल्लीतील एम्स हे एक ठिकाण आहे. गेल्या आठवडय़ातच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लवकरच देशवासियांना ‘शुभवार्ता’ मिळेल असे ट्विट करत कोरोनावरील लसीची मानवी चाचणी नजिकच्या काळात करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार ही अंमलबजावणी झाल्याचे समजते.
सात दिवस वैद्यकीय देखरेख
डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकाला दोन तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. आता पुढील सात दिवस त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. शुक्रवारी दुपारी ठीक 1 वाजून 30 मिनिटांनी पहिल्या स्वयंसेवकाला लस देण्यात आली असल्याची माहिती ‘एम्स’मधील तज्ञ डॉ. संजय राय यांनी दिली. लसीचा हा पहिला डोस देण्यापूर्वी संबंधित 30 वषीय व्यक्तीची प्राथमिक वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. या चाचण्यांमध्ये तो पात्र ठरल्यामुळे कोरोना लस देण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. मानवी चाचणी करण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी तयारी दर्शवली होती. मात्र, प्रायोगिक तत्वावर एका व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. त्याच्या ओळखीबाबत सध्या गुप्तता बाळगण्यात आली आहे.
दुसऱया टप्प्यात 750 जणांवर चाचणी
पहिल्या टप्प्यात 375 स्वयंसेवकांवर लसची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यातील जास्तीत जास्त 100 चाचण्या ‘एम्स’मध्येच घेतल्या जाणार आहेत. दुसऱया टप्प्यात देशातील विविध ठिकाणच्या 12 रुग्णालयांमध्ये ही चाचणी होणार असून जवळपास 750 जणांवर मानवी चाचणीचा प्रयोग केला जाणार आहे. हे स्वयंसेवक 12 ते 65 वयोगटातील असतील, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले.
वेगवेगळय़ा वयोगटातील व्यक्तींनाही देणार डोस
कोरोना विषाणूविरोधी लसीची चाचणी करण्यासाठी दिल्लीत साडेतीन हजारहून अधिक स्वयंसेवक पुढे सरसावले होते. पहिल्या टप्प्यात 375 जणांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे. 18 ते 55 वयोगटातील व्यक्तीवर ही चाचणी केली जाणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या स्वयंसेवकांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर 14 दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे. लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर चाचणी केलेल्यांची पुनर्तपासणी केली जाणार आहे.
स्वस्त किंमतीतील औषधही उपलब्ध
कोरोना विषाणूवर एका वैद्यकीय कंपनीने स्वस्त किंमतीचे औषध बनवल्याचा दावा केला आहे. ‘फॅव्हिटॉन’ असे या औषधाचे नाव असून ते ब्रिंटन फार्मास्युटिकल्सने बनविले आहे. सदर औषध बाजारात आणण्याची परवानगीही त्यांना ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडून (डीसीजीआय) मिळाली आहे. या औषधाची एक टॅब्लेट 59 रुपयात उपलब्ध होणार असल्याची माहिती सध्या उपलब्ध झाली आहे. हे एक अँटीव्हायरल औषध असून ते कोरोना रुग्णांना विषाणूंविरुद्ध लढण्यास मदत करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
‘फॅव्हिटॉन’ 200 मिलीग्राम टॅब्लेटमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका टॅब्लेटची एमआरपी 59 रुपये असेल. त्यापेक्षा जास्त किमतीला ते विकले जाणार नाही. कोरोनाचा सौम्य किंवा मध्यम संसर्ग असलेल्या रुग्णांसाठी हे औषध परिणामकारक ठरणार असल्याचे ब्रिंटन फार्माने स्पष्ट केले आहे.
‘कोवॅक्सिन’ला डीसीजीआयची अनुमती...
हैदराबादस्थित भारत बायोटेक या कंपनीने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (एनआयव्ही) सहकार्याने ‘कोवॅक्सिन’ लस विकसित केली आहे. या लसीला नुकतीच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (डीसीजीआय) मानवी चाचण्या घेण्यास मान्यता मिळाली होती.