अमेरिकेच्या लसीचे संशोधन चोरण्याचा चीन अन् रशियाचा प्रयत्न
रशिया आणि चीन अमेरिकेच्या लसप्रकल्पाचे संशोधन तसेच विदा चोरण्याचा कट रचत असल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. अमेरिकेत फायजर समवेत काही कंपन्या कोरोनावरील लस तयार करत आहेत. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठासह अनेक अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे. चीन आणि रशियाच्या गुप्तचर यंत्रणा संशोधनाचा तपशील चोरण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. ब्रिटनच्या गुप्तर यंत्रणेने फायबर ऑप्टिक्स केबल्स विश्लेषणानंतर याचा खुलासा केला होता. इराण देखील या चोरीत सामील असल्याचा संशय आहे.
दुसरा देश लसप्रकल्पावर कशाप्रकारे पुढे जात आहे हे जाणून घेण्याची इच्छा जगातील प्रत्येक विकसित देशाला आहे. या माहितीकरता गुप्तचर यंत्रणांचा सर्रास वापर केला जात आहे. अमेरिकेनेही स्वतःच्या लससंशोधन आणि विकासासंबंधीचा विदा चोरी होण्यापासून वाचविण्यासाठी ठोस तयारी केली आहे. नाटोचे इंटेलिजेन्स नेटवर्कही याप्रकरणी मदत करत आहे.
चीनच्या कारवाया
आर्थिक आणि सैन्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत मूल्यवान असलेला डाटा चोरण्याचा कट रचला जात आहे. हे कृत्य कोण करतेय हे आम्ही जाणतो असे उद्गार अमेरिकेच्या न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी जॉन डिमर्स यांनी काढले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा वित्तपुरवठा बंद करत त्याला चीनच्या हातचे बाहुले ठरविले आहे. जागतिक आरोग्य संघटनेलाही अमेरिकेने लसीच्या प्रकल्पासून दूर ठेवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेला यासंबंधी कुठलीच घडामोड न कळविण्याचा पवित्रा अमेरिकेने घेतला आहे. चीनच्या कृत्याची जाणीव अमेरिकेला मार्च महिन्यातच झाली होती. जागतिक आरोग्य संघटनेचे पदाधिकारी चीनच्या कटात सामील असल्याचा अमेरिकेला संशय आहे.
प्रत्येक कट अपयशी
एफबीआयने चीनचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अपयशी केले आहेत. गुप्तचर यंत्रणा आम्हाला धोक्याविषयी इशारा देतात, आम्ही सर्व जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळांना यासंबंधीची कल्पना देतो. या कटात अनेक देशांची सरकारेही सामील असल्याचे आम्ही जाणतो असे उद्गार युएनसीच्या प्रवक्त्या लेस्ली मिंटन यांनी काही दिवसांपूर्वी काढले आहेत. ब्रिटनची इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलान्स एजेन्सी जीसीएचक्यूने अमेरिकेला रशियाच्या कटासंदर्भात सतर्क केले होते. यानंतरच होमलँड सिक्युरिटी आणि एफबीआयने सतर्क होत अनेक पावले उचलली आहेत.
राजकीय दबावासमोर झुकणार नाही कंपन्या, सुरक्षित अन् प्रभावी ठरल्यावरच लस सादर होणार
कोविड-19 च्या वाढत्या रुग्णांमुळे औषध कंपन्यांवर लवकरात लवकर लस सादर करण्यासाठी राजकीय दबाव वाढत आहे. विशेषकरून अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणूक होणार असल्याने हा दबाव अधिकच आहे. अशा स्थितीत औषध कंपन्या चालू आठवडय़ात संयुक्त वक्तव्य प्रसिद्ध करून लस सुरक्षित तसेच प्रभावी ठरत नाही तोवर मंजुरीसाठी ती सादर करणार नसल्याचे सांगणार आहेत. अमेरिकेत फायजर, जॉन्सन अँड जॉन्सन आणि मॉडर्नाने पुढील आठवडय़ात संयुक्त वक्तव्य प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय दबावात सादर होणाऱया लसीच्या प्रभावीपणावर आणि सुरक्षिततेवर अनेक वैज्ञानिक संशय व्यक्त करत होते.
इराण-रशियाकडून लसीचे उत्पादन
इराण आता रशियासोबत मिळून कोरोनावरील लसीचे उत्पादन करणार आहे. रशियातील इराणचे राजदूत आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इराण पश्चिम आशियात सर्वाधिक कोरोनाग्रस्त देश आहे. तेथे दिवसभरात 1,894 नवे रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत 3.84 लाखांहून अधिक रुग्ण देशात आढळून आले आहेत.
चीन : 10 नवे रुग्ण
चीनमध्ये दिवसभरात देशाबाहेरून आलेले 10 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. चीनमध्ये विदेशातून आलेल्या बाधितांची संख्या आता 2,573 वर पोहोचली आहे. यातील 2,397 रुग्ण बरे झाले आहेत. तर 176 जण अद्याप रुग्णालयात उपचार घेत असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. चीनमधील एकूण बाधितांचा आकडा 85 हजार 122 वर पोहोचला आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना महामारीला रोखण्यासाठी सरकारने अवलंबिलेल्या अयोग्य भूमिकेमुळे 100 हून अधिक डॉक्टर नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) सोडू इच्छित आहेत. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. हे डॉक्टर एकतर दुसऱया देशात किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जाऊ पाहत आहेत. ब्रिटनच्या डॉक्टर्स असोसिएशनची अध्यक्ष डॉ. समांथा बट-रॉडेन यांनी या महामारीमुळे एनएचएस डॉक्टर सर्वाधिक प्रभावित झाल्याचे म्हटले आहे. 3 वर्षांच्या आत एनएचएस सोडू असे अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांनी कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव पणाला लावला आहे. परंतु सरकारच्या भूमिकेमुळे ते नाराज आहेत. ऑनलाईन सर्वेक्षणात 1,758 डॉक्टर सामील झाले. एनएचएस सोडण्याच्या प्रश्नावर 10 पैकी 7 म्हणजेच 69 टक्के डॉक्टरांनी होय असे उत्तर दिले तर 26 टक्के डॉक्टरांनी नकार दिल्याचे त्या म्हणाल्या.
मेक्सिकोत अधिक बळी
कोरोना संक्रमणामुळे देशात अधिकृत नोंदीपेक्षा खूपच अधिक प्रमाणात मृत्यू झाल्याचे मेक्सिकोच्या सरकारने म्हटले आहे. देशात आतापर्यंत अधिकृत स्वरुपात 67 हजार 326 जणांना जीव गमवावा लागला असून 6.23 लाखांहून अधिक बाधित आढळले आहेत. देशभरात झालेल्या एका अध्ययनात मार्चपासून ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे आणखीन 1 लाख 22 हजार 765 लोकांना जीव गमवावा लागल्याचे दिसून आले आहे. परंतु अद्याप या आकडय़ाला अधिकृत संख्येत जोडण्यात आलेले नाही.
ब्राझील : 1.25 लाख बळी
ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 1.25 लाखांहून अधिक झाला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार एक आठवडय़ात 5 हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. मागील 24 तासांमध्ये 907 जण दगावले असून 51 हजार 194 नव s रुग्ण सापडले आहेत. देशात 32 लाखांहून अधिक जण संसर्गमुक्त झाले आहेत.
पाक : 484 नवे रुग्ण
पाकिस्तानात 484 नवे रुग्ण दिवसभरात आढळून आले आहेत. देशातील रुग्णसंख्या आता 2,98,509 वर पोहोचली आहे. देशातील बळींचे प्रमाण आता 6342 झाले आहे. अन्य देशांच्या तुलनेत पाकमधील रुग्णसंख्या कमी असले तरीही तेथे दिवसाकाठी 25 हजार चाचण्या होत आहेत.
मेलबर्न : टाळेबंदी कायम
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात टाळेबंदी दोन आठवडय़ांसाठी वाढविण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला आहे. व्हिक्टोरिया प्रांतातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी खबरदारीच्या दृष्टीकोनातून 28 सप्टेंबरपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत.