कुडाळ-उद्यमनगर येथील घटना : सोन्याची साखळी केली लंपास
वार्ताहर / कुडाळ:
मी क्राईम ब्रँचचा अधिकारी आहे. स्मगलिंग सुरू आहे, असे सांगून एका दुचाकीस्वार वृद्धाच्या दुचाकीची तपासणी केली. नंतर त्या वृद्धाकडील सोन्याची साखळी व पैसे रुमालात बांधून ठेवण्याचा बहाणा केला आणि हातचलाखीने त्याची सोन्याची साखळी लंपास केल्याची घटना कुडाळ-उद्यमनगर येथे शनिवारी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत लवू गोविंद हडकर (64, रा. नेरुरपार-कुडाळ) यांनी कुडाळ पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी त्या अनोळखी तोतया पोलीस अधिकाऱयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अनोळखी व्यक्तीने थांबविले
शनिवारी लवू हडकर आपल्या ताब्यातील डिओ दुचाकीने कुडाळ बाजारात आले होते. सामान खरेदी करून ते आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी हायवेनजीकच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर गेले. तेथून ते पुन्हा कुडाळच्या दिशेने येत असताना उद्यमनगर येथील ओंकार डिलक्स समोरच्या रस्त्यावर पाठिमागून मोटारसायकलवरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना थांबविले.
तुमची दुचाकी तपासायची आहे
‘तुम्हाला समजत नाही. मी तुम्हाला हात दाखविला होता. तुम्ही गाडी का थांबविली नाही?’, अशी विचारणा त्याने केली. ‘कशासाठी साहेब?’, असे हडकर यांनी त्याला विचारताच त्याने ‘आपण क्राईम ब्रँचचा अधिकारी आहे. स्मगलिंग सुरू आहे. तुमची दुचाकी तपासायची आहे’, असे सांगितले. तेव्हा हडकर यांनी आपल्या दुचाकीची डिकी उघडून दाखविली.
रुमालाला गाठ बांधून डिकीत ठेवला
नंतर त्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्या दुचाकीची कागदपत्रे पाहिली. तसेच त्यांच्याकडील पिशवी तपासली. त्यांच्याकडील रुमालात खिशातील पैसे व गळय़ातील आठ ग्रॅमची अंदाजे 40 हजार रु. किंमतीची सोन्याची साखळी बांधून ठेवायला सांगितले. नंतर त्याने त्या रुमालाला गाठ बांधून तो त्यांच्या दुचाकीच्या डिकीत ठेवला आणि तो मोटारसायकलने निघून गेला.
फसवणूक झाल्याचे आले लक्षात
काही अंतरावर जाऊन हडकर यांनी डिकीतील रुमाल उघडून खात्री केली. तेव्हा त्यात पैसे हेते. मात्र, सोन्याची साखळी दिसली नाही. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या अनोळखी व्यक्तीने आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगून हातचलाखीने सोन्याची साखळी लंपास केली. त्याने डोक्यावर हेल्मेट तसेच पांढऱया रंगाचा चौकटचा शर्ट व काळय़ा रंगाची फूलपँट परिधान केली होती. कुडाळ पोलीस तपास करीत आहेत.