ऑनलाईन टीम / पुणे :
ग्रामीण भागात होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मिशन मोडवर काम करण्याचा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.
हवेली तालुक्यातील ग्रामपंचायत गुजर-निंबाळकरवाडी येथे कोरोनामुळे एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांसोबत जिल्हाधिकारी राम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा केली.
यावेळी घडलेल्या घटनेबाबत येत्या 7 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या तसेच याबाबत फेरआढावा घेणार आहे. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने वाटप करण्यात आलेल्या कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या इशाराही जिल्हाधिकारी राम यांनी दिला.
ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने गावपातळीवर कोरोना विषयक जनजागृती वर द्या, कोरोनाबाधित रुग्णांबाबत दररोज अहवाल सादर करा, गृह विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींसाठी गृह विलगीकरण संच उपलब्ध करुन द्यावे, पल्स ऑक्सिमिटर सरपंच आणि ग्रामसेवक यांना देऊन वापर करण्याबाबत त्यांना माहिती द्या आदी सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.