अमेरिकेत 47 हजारपेक्षा अधिक मृत्यू
अमेरिकेत एका दिवसात 2341 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा 47,681 वर पोहोचला आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख 49 हजार 092 झाली आहे. न्यूयॉर्क प्रांतात 20 हजारांपेक्षा अधिक बळी गेले आहेत. अमेरिकेच्या नौदलातील 26 नौकांवर रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेला महामारीला गरीब देशाप्रमाणे तोंड दिले आहे. लोकांना मदत पुरविणाऱया सेवा अपयशी ठरल्या आहेत. अमेरिकेतील 14 टक्के लोक सरकारच्या फूड व्हाउचरवर अवलंबून आहेत असे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ जोसेफ स्टिग्लेट्ज यांनी म्हटले आहे.
इम्रान यांचा अहवाल निगेटिव्ह
पाक पंतप्रधान इम्रान खान यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. काही दिवसांपूवीं इम्रान हे प्रसिद्ध समाजसेवक आणि ईदी फौंडेशनचे अध्यक्ष अब्दुल सत्तार ईदी यांचे पुत्र फैसल यांना भेटले होते. फैसल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पाकिस्तानात कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार 76 झाली असून 212 जणांचा मृत्यू झाला आहे. पाक सरकारने रमजानकाळात मशिदीत नमाज पढण्याची अनुमती दिली आहे. सरकराच्या या निर्णयामुळे डॉक्टर चिंतेत आहेत. या निर्णयामुळे संसर्गाचा फैलाव धोकादायक पातळीवर पोहोचू शकतो. हा निर्णय दुर्दैवी आहे. आमच्या मौलवींची भूमिका अत्यंत बेजबाबदारपणाची असल्याचे उद्गार पाकिस्तान मेडिकल असोसिएशनशी संबंधित डॉ. कैसर सज्जाद यांनी काढले आहेत.
4 वाघ, 3 सिंह, 2 मांजरांना लागण
न्यूयॉर्कमध्ये दोन पाळीव मांजरे आणि ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयात 4 वाघ तसेच 3 सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. बाधित मांजरं वेगवेगळय़ा कुटुंबातील आहेत. एका घरात कुणीच कोरोनाबाधित नव्हता. तर दुसऱया मांजराच्या मालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
चीन : लक्षणरहित 27 नवे रुग्ण
चीनमध्ये कुठलीच लक्षणे न आढळणारे 27 नवे रुग्ण सापडले आहेत. देशात अशा रुग्णांची संख्या आता 980 झाली आहे. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने आरोग्य अधिकाऱयांना महामारी नियंत्रित करण्यावर लक्ष देण्यास सांगितले आहे. ताप, खोकला यासारखी लक्षणे न दिसून येणाऱया रुग्णांमुळे महामारी फैलावण्याचा धोका अधिक आहे. चीनमध्ये बुधवारी कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे नॅशनल हेल्थ कमिशनने म्हटले आहे. चीनमध्ये आतायर्पंत 82 हजार 798 रुग्ण सापडले असून 4632 जणांचा मृत्यू झाला आहे.
जपानमध्ये रुग्ण वाढले
जपानमध्ये आतापर्यंत 11 हजार 950 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 299 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील संसर्गाचा वेग वाढत चालला आहे. तर नागासाकी किनाऱयावर उभ्या असलेल्या इटलीच्या जहाजावर एकूण 48 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. जहाजावर गुरुवारी 14 नवे रुग्ण आढळल्याची माहिती स्थानिक अधिकाऱयांनी दिली आहे.
युक्रेन : 6592 रुग्ण
युक्रेनमध्ये 467 नवे रुग्ण आढळून आल्याने बाधितांचा एकूण आकडा 6,592 झाला आहे. तर 174 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशात आतापर्यंत 424 जणांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. नव्या रुग्णांचा आकडा कमी होत नसल्याने राष्ट्रव्यापी क्वारेंटाईन 12 मेपर्यंत वाढविण्याची विनंती आरोग्यमंत्री मॅक्सिम स्टीपानोव्ह यांनी सरकारला केली आहे.