शुक्रवारी 280 बाधित, एकाचा मृत्यू
प्रतिनिधी / पणजी
राज्यात सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या आता दोन हजारांच्या जवळ पोहोचली असून बुधवारी 200, गुरुवारी 265 आणि काल शुक्रवारी 280 अशा संख्येने रुग्ण रोज सापडू लागले आहेत. भरीस पणजी केंद्राने आपली द्विशंभरी पार करत मडगाव केंद्रावर मात करून पुन्हा अव्वल स्थान प्राप्त केले आहे. पणजीसह पर्वरीतही रुग्णसंख्या 200 वर पोहोचली असून मडगाव, फोंडा व वास्को या केंद्रातील रुग्णसंख्याही झपाटय़ाने वाढत आहे. शुक्रवारी हवाई, रेल व रस्तामार्गे आलेले तब्बल 12 बाधित सापडले आहेत.
शुक्रवारी 24 तासात 280 रुग्ण सापडले आहेत. त्याद्वारे सक्रीय रुग्णसंख्या 1914 वर पोहोचली आहे. 81 रुग्ण बरे झाले तर 24 तासात एकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या 832 झाली आहे. आतापर्यंत एकूण 58584 जणांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातील 55838 जण बरे झाले. संशयित रुग्ण म्हणून 39 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले तर 148 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
पणजीत सर्वाधिक 210 रुग्ण
सध्या विविध आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱया रुग्णात सर्वाधिक 210 रुग्ण पणजी केंद्रात आहेत. द्वितीय स्थानी पर्वरी केंद्र आले असून तेथे 200 रुग्ण आहेत. त्याखालोखाल मडगाव केंद्रात 188, फोंडय़ात 151, कांदोळीत 141, वास्कोत 128, कुठ्ठाळी व म्हापसात प्रत्येकी 84, कासावलीत 73, शिवोलीत 67, चिंबल 64, चिंचिणी 55, हळदोणे व सांखळीत प्रत्येकी 43, खोर्लीत 41 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र 40 पेक्षा कमी रुग्ण आहेत.
सक्रीय रुग्णांची केंद्रवार संख्या पुढीलप्रमाणे आहेः डिचोली 31, सांखळी 43, पेडणे 29, वाळपई 03, म्हापसा 84, पणजी 210, हळदोणा 43, बेतकी 23, कांदोळी 141, कासारवर्णे 12, कोलवाळ 22, खोर्ली 41, चिंबल 64, शिवोली 67, पर्वरी 200, मये 04, कुडचडे 20, काणकोण 17, मडगाव 188, वास्को 128, बाळ्ळी 10, कासावली 73, चिंचिणी 55, कुठ्ठाळी 84, कुडतरी 20, लोटली 33, मडकई 14, केपे 22, सांगे 09, शिरोडा 14, धारबांदोडा 22, फोंडा 151 व नावेलीत 25 रुग्ण आहेत. त्याशिवाय हवाई, रस्ता, रेल्वेमार्गे आलेले 12 प्रवाशी बाधित सापडले आहेत.
- 02 एप्रिलपर्यंतचे एकूण रुग्ण 58584
- 02 एप्रिलपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 55838
- 02 एप्रिलपर्यंतचे सक्रिय रुग्ण 1914
- 02 एप्रिल रोजीचे नवे रुग्ण 280
- 02 एप्रिल रोजी बरे झालेले रुग्ण 81
- 02 एप्रिल रोजीचे बळी
- 01 आतापर्यंतचे एकूण बळी 832
वास्कोत रूग्णसंख्येत पुन्हा वाढ
मुरगाव तालुक्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत सतत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढू लागली आहे. सद्यस्थितीत वास्को शहर परीसरात 128 कोरोना रूग्णांची नोंद झालेली असून कुठ्ठाळी व कासावलीतील प्राथमीक आरोग्य केंद्रात प्रत्येकी 84 व 73 रूग्णांची नोंद झालेली आहे. तालुक्यातील रूग्णांचा आकडा 285 पर्यंत पोहोचलेला आहे. सासष्टी खालोखाल मुरगाव तालुक्याचा क्रमांक लागत आहे.
मागच्या वर्षी जूनमध्ये पहिल्याच दिवशी वास्कोतील मांगोरहिलच्या वस्तीत एकाच वेळी व एकाच कुटुंबात पाच कोरोना बाधीत आढळून आले होते. या प्रकाराने सबंध गोव्यात खळबळ माजली होती. त्यानंतर या वस्तीलाच कोरोनाने घेरले होते. त्यामुळे दोन महिने ही वस्ती कंटेन्मेंट झोनच्या निर्बंधाखाली आली होती. त्याबरोबरच संबंध वास्कोसह मुरगाव तालुका परिसरात हा संसर्ग पसरल्याने मुरगाव तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या बाराशेहून अधिक झाली होती. वास्कोतील खारवीवाडा, बायणा, सडा, नवेवाडेसह झुआरीनगरपर्यंत कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले होते. कोरोनाच्या बाबतीत वास्को शहर व परिसर हॉटस्पॉट बनल्याने उर्वरीत गोव्यात वास्कोतील लोकांप्रती भिती निर्माण झाली होती. वास्कोत ठिणगी पडल्यानंतरच सबंध गोव्यात कोरोना संसर्ग पसरला होता. सध्या वास्कोत मागच्या वर्षासारखी भिती नसली तरी रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंताही वाढू लागलेली आहे.
उर्वरीत गोव्याबरोबरच वास्कोतही गेले काही दिवस रूग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. त्यामुळे लोक पुन्हा सतर्क झालेले आहेत. मात्र, काही लोकांमध्ये निष्काळजीपणाही मोठय़ा प्रमाणात दिसून येत असल्याने भिती व्यक्त करण्यात येत आहे. काल शुक्रवारी वास्कोतील शहर आरोग्य केंद्राकडे 128 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. कुठ्ठाळीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात 84 तर कासावलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात 73 कोरोना रूग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे मुरगाव तालुक्यातील एकूण रूग्णांची संख्या सद्यस्थितीत 285 झालेली आहे. दक्षिण गोव्यात सासष्टी पाठोपाठ मुरगाव तालुक्यात रूग्णांमध्ये अधिक वाढ झालेली आहे.