जि.प.सदस्य मायकल डिसोजा यांचा पाठपुरावा
ओटवणे / प्रतिनिधी:
सावंतवाडी शहरानजिक असलेल्या कोलगावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने या गावासाठी दुसऱ्या आरोग्य उपकेंद्राची गरज लक्षात घेऊन या गावातील भोमवाडीत दुसऱ्या आरोग्य उपकेंद्राला पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूरी दिली आहे. यासाठी कोलगाव जिल्हा परिषद सदस्य तथा सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष मायकल डिसोजा यांचा गेले पाच वर्षे पाठपुरावा सुरु होता.
कोलगावच्या वाढत्या शहरीकरणासह लोकसंखेतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे या गावाला एका आरोग्य केंद्राची सेवा अपुरी पडत होती. पर्यायाने गावात दुसरे आरोग्य उपकेंद्र भोमवाडीत होण्यासाठी मायकल डिसोजा यांचे प्रयत्न सुरु होते.
अखेर मायकल डिसोजा यांच्या प्रयत्नांना यश आले असून या उपकेंद्रामुळे लोकांना चांगली व तात्काळ आरोग्य सेवा मिळणार आहे. गावासाठी दुसरे आरोग्य उपकेंद्र मंजूर झाल्याबद्दल कोलगाववासियानी समाधान व्यक्त केले असुन जि. प. सदस्य मायकल डिसोजा यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहे.