निकृष्ट दर्जाच्या कामाचा परिणाम : शॅडो कौन्सिल
प्रतिनिधी /मडगाव
भू-गटार विभागाच्या कंत्राटदाराने राबविलेल्या कूचकामी पायाभूत कामांची झळ कोलमरड-मडगाव भागाला बसली असून कामांच्या निकृष्ट दर्जाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. सितारा मोटर्स ते ईएसआय हॉस्पिटलकडे जाणाऱया रस्त्याचा काही भाग बुधवारी संध्याकाळी खचून रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा खड्डा पडला आहे, याकडे शॅडो कौन्सिलने लक्ष वेधले आहे.
शॅडो कौन्सिलने यापूर्वी घरे आणि इमारतींना भू-गटार वाहिनीशी जोडण्यासाठी भू-गटार विभागाने नियुक्त केलेल्या ठेकेदारामार्फत होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांसंदर्भात तक्रार केली होती, असे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कुतिन्हो हे पेशाने स्वतः एक सिव्हिल इंजिनिअर आहेत. हातोडय़ाचा वापर करून त्यानंतर निकृष्ट दर्जाचे काँक्रिट वापरले गेले. तसेच अनेक तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले गेल्याने रस्ता खचून हा खड्डा पडल्याचा दावा कुतिन्हो यांनी केला आहे.
आमची मागणी आहे की, कंत्राटदारामार्फत राबविण्यात आलेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामांची त्वरित चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत. चौकशी न झाल्यास आम्ही भू-गटार विभागाच्या साहाय्यक अभियंत्यांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार पुढील कायदेशीर कृती करणे आम्हाला भाग पडेल, असा इशारा कुतिन्हो यांनी दिला आहे.