नंदकुमार तेली / कोल्हापूर
अनलॉकनंतर पाच महिन्यांपासून कोल्हापुरातील धावपटूंनी सरावात सातत्य राखले असून त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षक प्रा.प्रकुल पाटील-मांगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली परफेक्ट ट्रॅक मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या पी.एम.स्पोर्टसच्या अॅथलेटिक्स प्रशिक्षण शिबीरात शहरासह जिल्हयातील ग्रामीण भागातून विविध गटातील ७५ धावपटूंनी सहभाग नोंदविला आहे. या शिबीराच्या माध्यमातून खेळाडू कठोर परिश्रम घेत आहेत.
चमकदार कामगिरीसाठी खेळाडू घेताहेत कठोर परीश्रम
लॉकडाऊनमुळे खेळाचा सराव व स्पर्धांवर बंदी घालण्यात आली होती. अनलॉक जाहीर केल्यानंतर प्रशासनाच्या नियमात राहून खेळांच्या सराव व स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. पी.एम.स्पोर्टसतर्फे नोव्हेंबर २०२०पासून अॅथलेटिक्स प्रशिक्षण शिबीराला सुरूवात झाली आहे. यामध्ये सहभागी शहरासह जिल्हयातील ग्रामीण भागातील विविध गटातील धावपटूंनी सरावात सातत्य राखले आहे. हे सर्वच खेळाडू जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावण्यासाठी कठोर परीश्रम घेत आहेत.
किड्स ते सिनिअर बॉईजपर्यंतचे विविध गट
अॅथलेटिक्स प्रशिक्षण शिबीरात किड्स ते सिनिअर बॉईजपर्यंतचे विविध गट करण्यात आले आहेत. यामध्ये किड्स अॅथलेटिक्स गट (7 ते 10 वर्षे वयोगटातील) 20 खेळाडू, बिगीनर गट (नविन अॅथलेटिक्स 11 ते 13 वर्षे) – 30 खेळाडू, ज्युनिअर गट (14 ते 18 वर्षे) – 15 खेळाडू, वरीष्ठ गट (सिनिअर बॉईज) – 10 खेळाडू आदींचा समावेश आहे. या विविध गटात सुमारे 75 खेळाडूंनी नाव नोंदणी केली असून छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी 6 ते 9 व दुपारी 4 ते 6 अशा दोन सत्रात सरावात सातत्य राखले आहे. यापूर्वी सिनीअर गटातील (वरीष्ठ) शार्दूल ससे, स्टेन्जू वर्गीस, समाधान खेडकर आदी धावपटूंनी राष्ट्रीय युनिव्हर्सिटी पातळीवरील ऍथलेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची कमाई केली आहे. तसेच नुकत्याच छत्तीसगड येथे झालेल्या वेस्ट झोनल नॅशनल ऍथलेटीक्स स्पर्धेत श्रीराम हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीतील विद्यार्थी ओमकार अतिग्रेने 600 मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण तर लांब उडी स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आहे.
यांचे लाभत आहे मार्गदर्शन व सहकार्य
प्रशिक्षण शिबीरातील खेळाडूंचा सराव दोन सत्रांमध्ये कोल्हापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सहसचिव प्रा.प्रकुल पाटील-मांगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांना सहाय्यक प्रशिक्षक निखिल भारती, अमोल आळवेकर, प्रा.रामचंद्र पाटील, प्राचार्य डॉ.सुरेश फराकटे आदींसह कोल्हापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.
मुलांना डाएटनुसार खाद्य पदार्थाचा डबा
शहरासह चंदगड, गडहिंग्लज, आजरा, करवीर आदी ग्रामीण भागातील विविध वयोगटातील खेळाडूंनी (मुले-मुली) शिबीरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. शिबीरातील मुलांना लिंबू सरबत, पाणी बॉटल व ठरवून दिलेला डाएटचा डबा घरातून आणावा लागतो. सराव झाल्यानंतर त्यांनी तो डबा मैदानावरच खाण्यास दिला जातो. या डब्यामध्ये मोड आलेली कडधान्ये, उकडलेला बटाटा, ड्रायप्रुट, फळे, अंडी आदी पौष्टिक खाद्य पदार्थांचा समावेश आहे. तसेच क्रिकेट व पोलिस भर्तीसाठी प्रयत्न करणारे खेळाडू फिटनेससाठी प्रशिक्षण शिबीरातील सरावात सहभागी होतात.