25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक क्रमवारी अव्वल स्थान : आयएसएसएफ जाहीर केली यादी
संग्राम काटकर / कोल्हापूर
क्रोएशियातील ओस्जेक येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या कोल्हापूरची सुकन्या राही सरनोबतने भारताचा शिरपेचात आणखीन एक तुरा रोवला. जागतिक महिला नेमबाजीतील 25 मीटर पिस्तूल या प्रकारातील राहीने जगातील नामवंत नेमबाजांना मागे टाकत जागतिक क्रमावारीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. इंटरनॅशनल स्पोर्टस् शूटिंग फेडरेशनने (आयएसएसएफ) जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत राही तब्बल 3750 गुणांसह नंबर वनवर पोहचली आहे. अशी कामगिरी करणारी राही कोल्हापूरची पहिली तर महाराष्ट्राची तिसरी महिला नेमबाज ठरली आहे.
राहीने 2007 पासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वीसहून अधिक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळवली आहेत. युवा राष्ट्रकुल (2008), राष्ट्रकुलमध्ये (2010) झालेल्या नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकांना गवसणी घालत राही ही खऱ्या अर्थाने जगाच्या पटलावर आली. या दोन सुवर्ण पदकांवर न थांबता 2011 साली अमेरिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही कांस्य पदक मिळवले. अमेरिकेतील जागतिक पातळीवर स्पर्धेत चौथे स्थान मिळवून 2012 च्या लंडन ऑलिंपिकसाठीचे तिकीट मिळवले.
ऑलिंपिकमध्ये फारशी मजल मारता आली नसली तरी तिने जागतिक पातळीवर होत राहिलेल्या स्पर्धांमध्ये पदके मिळविण्याचा सिलसिला कायम राखला. दक्षिण कोरियात 2013 साली झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेबरोबरच 2014 साली झालेल्या राष्ट्रकुलमध्ये सुवर्णवेध घेतला. तसेच 2018 साली जकार्तामध्ये झालेली आशियाई स्पर्धेत पुन्हा सुवर्ण तर काही महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या स्पर्धेतही राहीने सांघिक गटात एक सुवर्ण व एक रौप्य पदकावर कब्जा केला. पाचच दिवसांपूर्वी क्रोएशियातील ओस्जेक येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राहीने अपेक्षेप्रमाणे सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्याचबरोबर आजवरच्या आपल्या कामगिरीच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 39 गुण मिळवून आंतरराष्ट्रीय नेमबाजीत आपला दबदबा आणखी वाढवला आहे.
दिल्ली आणि क्रोएशियातील विश्व चषक स्पर्धेकडे मी टोकिओ ऑलिंपिकची तयारी म्हणूनच पाहत होते. त्यात मी यशस्वी झाले. आपण टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक मिळवू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
–राही सरनोबत, नेमबाज
अंजली, हिनानंतर राही...
जागतिक महिला नेमबाजीत याआधी महाराष्ट्राच्या अंजली भागवत-वेदपाठकने 2003 मध्ये दहा मी. एअर रायफल प्रकारात तर हिना सिद्धूने 2014 मध्ये 25 मीटर पिस्तुल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर आता राहीने नंबर वन संपादन केला आहे.
राही दुसऱ्यांदा ऑलिंपिक खेळणार…
राहीने यशातील सातत्य कायम ठेवत कायम ठेवत 2019 साली म्युनिच (जर्मनी) येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. या कामगिरीने तिला टोकियो ऑलिंपिकचे तिकीट मिळवून दिले. 2012 साली लंडनमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये ही सहभागी झाली होती. दोन वेळा ऑलिंपिकसाठी निवड झालेली राही ही कोल्हापूरची पहिली नेमबाज ठरली आहे.