जि.प.कडून कोरोना लसीकरणाचे गावनिहाय नियोजन
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हयामध्ये 16 जानेवारी पासुन कोविड लसीकरण मोहिम सुरु झाली असून 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण लवकर पुर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार जिह्यातील सर्व शासकिय आरोग्य संस्थेमध्ये लसीकरण सत्रे सुरु केली आहेत. लसीकरण सत्राच्या ठिकाणी ऑफलाईन पध्दतीनेही 18 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये लसीकरण सत्राचे नियोजन केले असून सदर गावामध्ये जास्तीच्या टीम लावून शिल्लक लार्भार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी दिली.
डॉ. साळे म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत जोमाने व शिस्तबध्द पध्दतीने सुरु आहे. त्यानूसार जिल्हयामध्ये मोठया प्रमाणावर कोविड लसीकरण करण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे. लसीकरण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती व जनसहभाग मिळणे गरजेचे आहे. 18 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना लस देवून त्यांना संरक्षित करण्यात येणार आहे. त्याकरीता इतर विभागांचाही सहभाग घेण्यात येत आहे. यामध्ये महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, ग्राम विकास विभाग, अल्पसंख्याक विभाग, सामाजिक न्याय व गृह विभाग आदी विभागांचा समावेश आहे. या विभागाचे ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी कोविड लसीकरण सत्राच्या ठिकाणी सोशल मोबिलायझेशन, डाटा ऍन्ट्री, जनजागृती आदी कामामध्ये सहभाग घेणार आहेत.
28 लाख 54 हजार नागरीकांनी घेतली लस
कोल्हापूर जिल्हयामध्ये कोविड लसीकरणासाठी पात्र लाभार्थी 31 लाख 26 हजार 917 इतके असून आजअखेर पहिली लसीची मात्रा घेतलेले 20 लाख 579 लाभार्थी आहेत हे प्रमाण 64 टक्के आहे. दुसरी लसीची मात्रा घेतलेले 8 लाख 54 हजार 351 लाभार्थी असून हे प्रमाण 43 टक्के आहे. जिल्हयात सर्व वयोगटातील लस घेतलेले 28 लाख 54 हजार 930 नागरिकांचे कोविडचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
30 सप्टेबरपर्यंत 1 हजार 846 लसीकरण सत्रांचे आयोजन
18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरणाचे अपेक्षित लाभार्थी 18 लाख 52 हजार 368 आहे. त्यापैकी 7 लाख 26 हजार 719 इतक्या नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. हे प्रमाण 39 टक्के इतके आहे. तसेच दुसरी लसीची मात्रा घेतलेले 4 हजार 428 लाभार्थी असून हे प्रमाण 7 टक्के आहे. या वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी जिल्हयात विशेष सत्राचे 14 ते 30 सप्टेंबर या कालावधीत 1 हजार 846 इतक्या सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कोविड लस घेऊन संरक्षित व्हा - जिल्हाधिकारी
कोविड लसीकरण हे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत चालू राहणार आहे. त्यानूसार ज्यादिवशी, ज्याठिकाणी, ज्यागावामध्ये लसीकरण सत्राचे नियोजन केले आहे. त्यादिवशी, त्याठिकाणी, त्यावेळेत उपस्थित राहून नागरीकांनी कोविडची लस घ्यावी असे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे. सदर ठिकाणी लसीकरण करण्यासाठी जिल्हापरिषदेची यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घ्यावे असे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सुचित केले आहे.