गडहिंग्लज उपविभागातील विदारक चित्र
गडहिंग्लज / रोहित ताशिलदार
दिवसेदिवस गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. यातून त्याचे राक्षसी रूप अधिकाधिक उग्र होत असून ग्रामीण भागात दहशत माजले आहे त्यामुळे सगळी यंत्रणाच हतबल झाली असून रूग्णांसमोर उभा राहण्याच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने कोरोना रूग्णच आता बेदखल झाल्या सारख्या दिसत आहे. एकूणच आता कोरोनाचा वाढता फैलाव कसा रोखायचा हा यक्ष प्रश्न सर्वांनपूढे उभा राहिला आहे.
गडहिंग्लज उपविभागात अनलॉकमुळे कोरोनाचा सामुहिक संसर्ग झाल्याने कोरोनाबाधित संख्या 1721 पोहचली आहे. यामध्ये गडहिंग्लज 684, आजरा 491 तर चंदगड तालुक्यातील 636 रूग्णांचा समावेश आहे. वाढत्या कोरोना रूग्णामुळे गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुके खबरदारीसाठी पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसापासून गडहिंग्लज उपविभागात दररोज सरासरी 50 हून अधिक रूग्ण सापडत आहेत. अनपेक्षित संकट असल्याने प्रशासनाचा उपाययोजना अगदी तोकडया पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वाढत रूग्ण संख्येमुळे एकी कडे आरोग्य यंत्रणा हादरली असली तर दुसरीकडे उपविभागातील आरोग्य विभागात जवळपास 158 रिक्त असल्याने याचा मोठा फटका बसत आहे. आहे त्या कर्मचारी, डॉक्टरवर अतिरिक्त काम चालू असून उपचाराअभावी मृत्यूची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. आता तर व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड आणि साहित्याचा तुटवडा पडत असल्याने भिषणता दिसली आहे. आजरा तालुक्यात तर एकही व्हिटेंलटरची बेडची सोय नसल्याने रूग्णांवर उपचारासाठी एक तर गडहिंग्लज अथवा कोल्हापूरला उपचारासाठी नेल्याशिवाय पर्याय नाही. त्या ठिकाणीपण तिच परिस्थिती असल्याने शेवटी मृत्यूलाचा आमंत्रण दिले जात आहे.
गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने रिक्त कर्मचारी वर्ग, डॉक्टर, बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड, साहित्याची तातडीने तरतुदी करून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे आवाहन पेलणार ? का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न – आमदार राजेश पाटील
गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाकडे असणार्या कर्मचार्यांची संख्या कमी आहे. यामुळे रूग्णांची अडचण होत आहे. याचा विचार करत तातडीने आरोग्य विभागाकडे आवश्यक डॉक्टर, कर्मचारी यांची नेमणुक करावी अशी मागणी आरोग्यमंत्री आणि आरोग्य राज्यमंत्री यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर चंदगडला ट्रामाकेअर सेंटर, गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयाची बेड क्षमता 200 करावी त्याचबरोबर चंदगड, आजरा ग्रामीण रूग्णालयाची बेड क्षमता वाढवावी यासाठीही प्रयत्न करत असून अधिवेशनाच्या दरम्यान मंत्र्याचे लक्ष याकडे वेधले आहे.