प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात 14754 जणांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेसह शासकीय आणि खासगी डॉक्टर, मेडिकल स्टाफ, आशा कर्मचारी आणि कोरोनाच्या संकट काळात सेवा बजावलेल्या अधिकारी, कर्मचाऱयांचाही समावेश आहे. या सर्वांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून डाटाबेस तयार करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले
शासनाने लसिकरण मोहीम राबविताना दोन टास्क फोर्स तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱया मोहिमेचे आयुक्त प्रमुख राहणार आहेत. लसिकरणाच्या पहिल्या टप्प्यात पंटलाईनवर काम केलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱयांसह शासकीय आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, ब्रदर्स व स्टाफचा समावेश आहे. यामध्ये 5300 महापालिका कर्मचारी आहेत. 1444 शासकीय डॉक्टर व स्टाफ आहे. तर खासगी वैद्यकीय क्षेत्रातील 8010 डॉक्टर व इतर स्टाफ आहे. या सर्वांच्या माहितीचे संकलन सुरू करण्यात आले आहे. लसिकरणाच्या पहिल्या टप्प्यात या सर्वांना समाविष्ठ केले जाणार आहे, असे प्रशासक डॉ. बलकवडे यांनी स्पष्ट केले.