प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास दिलेली मुदतवाढ आणि राज्य शासनाने महापालिकेवरील प्रशासकांना दिलेली मुदतवाढ यामुळे राज्यातील कोल्हापूरसह नवी मुंबई, कल्याण-डोबिवली, वसई-विरार, औरंगाबाद महापालिकांच्या निवडणुका वेळेत होणार की लांबणीवर पडणार याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र कोल्हापूर महापालिकेची निवडणूक मात्र मे अखेर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या संदर्भात कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महापालिका प्रशासनानेही निवडणुकीसाठी आवश्यक ती तयारी युद्धपातळीवर सुरू असून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादीवरील हरकती, तक्रारी, सूचनांनुसार दुरूस्त्या करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमाला मुदतवाढ दिली आहे. कोल्हापूर महापालिकेची अंतिम मतदार यादी 3 मार्च आणि 12 मार्चला मतदान केंद्र निहाय यादी प्रसिद्ध होणार होती. पण आयोगाने मुदतवाढ दिल्याने निवडणूक लांबणीवर पडणार अशी चर्चा सुरू झाली. त्यातच राज्य शासनाने महापालिका, नगरपालिकांवरील प्रशासकांना मुदतवाढ दिल्याने निवडणुकीविषयी उलटसुलट चर्चा आणि संभ्रम निर्माण झाला. निवडणूक लांबणीवर पडल्यास फायदा कुणाचा आणि तोटा कुणाचा याची चर्चा सुरू झाली. तयारी केलेल्या इच्छुकांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे.
संभ्रमाच्या वातावरणात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर वळगता इतर महापालिकांच्या अंतिम मतदार याद्यांचे काम अद्याप अपेक्षेनुसार पूर्ण झालेले नाही. त्यात अनेक त्रुटी आहेत. कल्याण-डोंबिवलीच्या 18 गावांच्या हद्दवाढीच्या संदर्भातील दावा सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर 12 मार्च रोजी निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे या महापालिकांना तयारीस वेळ मिळावा, यासाठी मतदार याद्या प्रसिद्धीस मुदतवाढ दिली आहे. अशी मुदतवाढ कोल्हापूर महापालिकेला मिळाली असली तरी पूर्व नियोजित मतदार यादीचे काम पूर्ण झाले आहे. काम पूर्णत्वाचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. तो त्यानंतर आयोगाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनाचे रूग्ण वाढले नाहीत तर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक मे महिन्याच्या शेवटच्या आठवडÎात घेण्यास आयोगाला कोणतीही अडचण नाही, असेही या सूत्राने स्पष्ट केले. कोल्हापूर व्यक्तीरिक्त इतर या महापालिकांवरील प्रशासक हे कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक नियुक्तीपूर्वी नियुक्त केले आहे. त्यांची मुदत एप्रिलमध्ये संपणार असल्याने त्यांना मुदतवाढ दिली आहे. कोल्हापूर बाबतीही हा प्रश्न येत नाही. कारण 15 नोव्हेंबर 2020 ते 15 मे 2021 अशी सध्याच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची मुदत आहे. अद्याप प्रशासकांना दिलेल्या मुदतवाढीचा आदेश कोल्हापूर महापालिकेला आलेला नाही.
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास जरी मुदतवाढ दिली गेली असली तरी कोल्हापूर महापालिका प्रशासनाकडून वेगाने तयारी सुरू आहे. त्यामुळे निवडणूक थोडी पुढे गेली तरी मे अखेर होण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
सतेज पाटील, पालकमंत्री तथा गृहराज्य मंत्री
अंतिम मतदार यादीचे काम पूर्ण झाले आहे. मुदतवाढीमुळे पुन्हा याद्या तपासून त्या संदर्भातील अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक, कोमनपा