शाहूनगर येथील तो रस्ता 40 फुटाचा करा : माळअंकले – गणेबैल परिसरातील नागरिकांचे निवेदन : चलवादी समाजासाठी निगम स्थापन्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शाहूनगर येथील कंग्राळी बी.के. ते दत्त मंदिरपर्यंतचा रस्ता 40 फुटाचा करावा. सिडीपीमध्ये या रस्त्याची रुंदी अधिक असली तरी येथील स्थानिक नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान होणार असून हा रस्ता 40 फुटाचाच करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शाहूनगर येथील हा रस्ता सध्या 28 ते 30 फुटाचा आहे. मात्र या रस्त्याची रुंदी सिडीपी मॅपमध्ये 60 फुट आहे. मात्र ही सर्व जमीन शेतजमीन असून 40 फुटाचा रस्ता केल्यास कोणतीच अडचण येणार नाही. तेंव्हा याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लक्ष्मी कदम, एम. एस. राक्षे, रामण्णा जाधव, प्रतीक्षा बडीगेर, महादेव अष्टेकर, मंगल पाटील, रेणुका मुचंडी, धनश्री देसाई यांच्यासह नागरिक व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
भुतनाथ मंदिराला जाण्यासाठी भुयारी मार्ग करा
गणेबैल जवळील श्री भुतनाथ देवस्थान हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. या मंदिराला माळअंकले येथून यात्रोत्सववेळी पालखी घेऊन जाण्यात येते. सध्या बेळगाव-खानापूर रस्त्याचे कामकाज सुरू असून हा रस्ता झाला तर भुतनाथ मंदिराकडे जाणे कठीण आहे. मंदिराला जाण्यासाठी फेरा मारुन जावे लागणार आहे. तेंव्हा भुतनाथ मंदिराजवळ भुयारी मार्ग करावा, अशी मागणी गणेबैल, माळअंकले येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माळअंकले गावचे हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. दरवषी यात्रा भरविली जाते. त्यावेळी पालखी या मंदिराला प्रदक्षिणा घालते. तेंव्हा भुतनाथ देवस्थानला जाण्यासाठी भुयारी मार्ग करावा, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी बुद्दाप्पा मोटर, डी. एस. निलजकर, वाय. ए. धबाले, कल्लाप्पा पाटील, यल्लाप्पा गावडे, अरुण तपासकर, सातेरी मणगावकर, मारुती पाटील, यल्लाप्पा देवलतकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
चलवादी समाजाच्या विकासासाठी निगमची स्थापना करा
चलवादी समाजाची जनसंख्या मोठी आहे. बेळगाव जिह्यामध्ये जे दलित आहेत त्यामधील 60 टक्के चलवादी समाजाचे आहेत. मात्र हा समाज अत्यंत मागासलेला असून या समाजाच्या विकासासाठी अभिवृद्धी निगम मंडळाची स्थापना करावी, यासह इतर मागण्यांसाठी चलवादी महासभेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
चलवादी महासभेच्यावतीने दरवषी निवेदन दिले जाते. मात्र अद्याप सरकार याबाबत विचार करण्यास तयार नाही. समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी बेळगाव शहरात दोन एकर जागा राखीव ठेवावी. याचबरोबर त्या ठिकाणी सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी 5 कोटी मंजूर करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
चलवादी महासभेचे राज्याध्यक्ष सिद्धय्या, निवृत्त आयएएस अधिकारी यांनीही मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा केला आहे. तेंव्हा तातडीने सरकारने निर्णय घेऊन या समाजाच्या विकासासाठी निगम स्थापन करावे, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दुर्गेश मेत्री, जिल्हा कार्याध्यक्ष हणमंत मधाळे, शहराध्यक्ष दीपक मेत्री, कुमार दरबारे, लक्ष्मण कांबळे, परशराम कोलकार, पारीस कोलकार, कृष्णा कोलकार, परशराम कांबळे, लक्ष्मण चौगुले, सुनील मोरे, महांतेश कांबळे व नागरिक उपस्थित होते.