कोरोना संकटात `सीपीआर’ची गौरवास्पद कामगिरी
म्युकरच्या दाखल 69 पैकी 36 रूग्णांवर शस्त्रक्रिया, म्युकरवरील पहिली शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णाला डिसचार्ज
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत `सीपीआर’मध्ये 20 दिवंसापुर्वी म्युकर मायकोसीसचा पहिला रूग्ण दाखल झाला, त्याच्यावर येथे पहिली शस्त्रक्रिया झाली. त्याला गुरूवारी डिसचार्ज मिळाला. या 20 दिवसांत सीपीआरमध्ये दाखल 69 पैकी 36 रूग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. खासगी हॉस्पिटल्सच्या तुलनेत म्युकर रूग्णांवर झालेल्या सर्वाधिक शस्त्रक्रियांतून सीपीआरची गौरवास्पद कामगिरी समोर आली आहे.
कोरोना रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाला, पण उपचारादरम्यान, त्यांच्यात म्युकर मायकोसीसचा संसर्ग होत असल्याचे समोर येत आहे. त्यातही कोरोना पॉझिटिव्ह मधुमेहीमध्ये म्युकर संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्यावर कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकरवरील उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात महिनाभरापुर्वी म्युकर मायकोसीसचा पहिला रूग्ण दिसून आला. राज्यात म्युकरचे रूग्ण वाढल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड स्थापण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या. त्यानुसार सीपीआरमध्ये सुरूवातीला कान, नाक, घसा वॉर्डमध्ये 10 बेड हेते. रूग्णसंख्या वाढल्याने मानसोपचार व नेत्र विभागात 20 बेड वाढवले. तिसऱ्या टप्प्यात ऑर्थोपेडीक वॉर्डमधील 50 बेड म्युकर रूग्णांसाठी खुले झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाप्रमाणेच म्युकर मायकोसिस रूग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेतून उपचार होत आहेत. सीपीआर वगळता 5 खासगी हॉस्पिटल्समध्ये म्युकर रूग्णांवर उपचार सुरू होते. आता अशा खासगी हॉस्पिटल्सची संख्या 11 वर पोहोचली आहे. तेथे जीवनदायी योजनेतून म्युकर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात गुरूवारी सीपीआरमध्ये 5 आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये 2 रूग्ण दाखल झाले. सध्या शहरातील खासगी हॉस्पिटल्समध्ये 40 तर ग्रामीण भागात 6 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. म्युकर रूग्णांची संख्या 136 झाली आहे. त्यात म्युकरने आजपर्यत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 107 रूग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सीपीआरमध्ये सध्या 91 म्युकर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अवघ्या 20 दिवसांत दाखल 69 रूग्णांपैकी 36 जणांवर कान, नाक, घसा, डोळ्यांशी निगडीत 36 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. आजपर्यत 21 `म्युकर’मुक्त झाले आहेत. येथे पहिली शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णाला गुरूवारी डिसचार्ज दिल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कान, नाक, घसा विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली. सीपीआरमध्ये गुरूवारी 5 नवे रूग्ण झाले, तर 13 जणांना डिसचार्ज मिळाला, जिल्ह्यात सद्यस्थितीत 107 रूग्ण उपचार घेत आहेत. म्युकर रूग्णांसाठी ऍम्फीटेरीसीन बी इंजेक्शन सीपीआरमध्ये प्राधान्याने उपलब्ध होत आहे. त्यामुळे येथे रूग्णसंख्या जास्त आहे. प्रतिदिन 2 ते 3 म्युकर रूग्णांवर शस्त्रक्रिया होत आहेत. गुंतागुंतीच्या पॉझिटिव्ह रूग्णांना कोरोनामुक्त केल्यानंतर आता जास्तीत जास्त म्युकर रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रियांची गौरवास्पद कामगिरी सीपीआरने नोंदवली आहे.