प्रतिनिधी / कोल्हापूर
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक विकास योजनेअंतर्गत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी दोन कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली. या विकासनिधीमुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या गावांना, वस्त्यांना मूलभूत सुधारणा होण्यासाठी चालना मिळणार आहे. हा निधी मिळवण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता, असे मंडलिक म्हणाले.
मंजूर कामांमध्ये पासार्डे ता. करवीर (25 लाख), हणमंतवाडी ता. करवीर (10 लाख), मौजे कळंब तर्फ कळे ता. करवीर (15 लाख), मौजे आडूर ता. करवीर (25 लाख), बाचणी ता. करवीर (20 लाख), बामणी ता. कागल (15 लाख), कसबा वाळवे ता. राधानगरी (10 लाख), चांदे ता. राधानगरी (10 लाख), सांगरूळ ता. करवीर (30 लाख), एकोंडी ता. कागल (5 लाख), मौजे सावर्डे दु. ता. करवीर (10 लाख), हेब्बाळ कसबा नूल ता. गडहिंग्लज (5 लाख), शिंगणापूर ता. करवीर (10 लाख), मौजे हळदी ता. कागल (25 लाख), मौजे करंजिवणे ता. कागल (25 लाख), मौजे शिंदेवाडी ता. कागल (24 लाख), मौजे बाचणी ता. करवीर (20 लाख), मौजे कुरुकली ता. करवीर (10 लाख) इत्यादी गावांचा समावेश आहे.
आणखी निधीसाठी प्रयत्नशील
सरकारी नियमानुसार दोन आर्थिक वर्षांमध्ये मंजूर विकासकामे पूर्ण करण्याचा कालावधी घातला आहे. तसेच वंचित विकासापासून वंचित वस्त्यांनाही टप्प्या टप्प्याने आणखी निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार मंडलिक म्हणाले.
रहिवाशांच्या गरजा विचारात घेणार
या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण, पोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते, गटर्स, स्माशानभूमी विकास, सार्वजनिक सुलभ शौचालये, ग्रंथालये, सभामंडप, धम्म केंद्र, व्यायामशाळा यासह संबंधित वस्तीतील रहिवाशांच्या गरजा विचारात घेऊन विकासकामे करण्यात येणार आहेत.