पुरामुळे बंद असलेल्या घरात चोरट्यांचा डल्ला
उचगाव / वार्ताहर
गांधीनगर येथील कोयना कॉलनी रोड वळिवडे गावाच्या हद्दीत पूराचे पाणी आल्याने बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून बेडरुममधील कपाट उचकटून सुमारे ७२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले.पूराचे पाणी कमी झाल्यानंतर मंगळवारी ही चोरी उघडकीस आली. याप्रकरणी राकेश चंदरलाल सचदेव (वय ३३ रा.कोयना कॉलनी रोड गांधीनगर) यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
राकेश सचदेव यांचे गांधीनगर मुख्य रस्त्यावर आराध्या ट्रेडींग नावाचे कारपेट दुकान आहे.सचदेव हे आपले वडील, भाऊ, भावजय यांच्यासह कोयना कॉलनी येथे राहतात.पुराचे पाणी वाढल्यामुळे ते दि.२३ जुलैला घराला कुलूप लावून नातेवाईक यांच्या घरी राहण्यास गेले होते. मंगळवारी दि.२७ रोजी पूराचे पाणी कमी झाल्याने सचदेव कुटुंब परत घरी गेले असता ही चोरीची घटना उघडकीस आली.
यावेळी घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी बेडरुमचे कपाटाचे लॉक तोडून त्यातील सोन्याची चेन, सोन्याच्या रिंगा, लहान मुलीचे चांदीचे पैंजण व वाळे, तसेच दुसऱ्या कपाटातून एक ग्रॅम वजनाचे २ सोन्याचे तुकडे व चांदीचे गणेश व लक्ष्मीची मूर्ती असे ७२ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केला. याबाबत गांधीनगर पोलिसांत चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.