प्रतिनिधी/ गगनबावडा
विना परवाना मालवाहतूक करणाऱ्या सात वाहनधारकांवर गगनबावडा प्रशासनाने १७ लाख रुपये दंडात्मक कारवाई केली. लोंघे (ता.गगनबावडा ) येथे सकाळी आठच्या सुमारास ही वाहने ताब्यात घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की तळकोकणातून कोल्हापूरकडे तर कोल्हापूरहून कोकण गोव्याकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु झाली आहे. चिरा, वाळू, सळी, सिमेंट, खडी इत्यादी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास लोंघे येथे अशा प्रकारचे सात मालवाहू ट्रक अडविले. संबंधित चालक, वाहनधारक यांच्याकडे रितसर मागणी केली असता ही सर्व विनापरवाना असल्याचे निदर्शनास आले. सात मालवाहू वाहनांवर तब्बल १७ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.ही सर्व वाहने गगनबावडा पोलिस ठाण्यात जमा केली आहेत. रितसर दंडात्मक रक्कम जमा केल्यानंतरच या गाड्या ताब्यात देण्यात येणार आहेत.तहसिलदार संगमेश कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार संजय वळवी,दोन सर्कल व सहा तलाठी यांच्या पथकाने ही कारवाई केली.दरम्यान दोन जिल्हे आणि राज्यांना जवळचा मार्ग म्हणून गगनबावडा मार्गे करुळ, भूईबावडा घाटातून अवजड वाहनांची रात्रंदिन वर्दळ असते.गगनबावडा महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने अनेकांनी धसका घेतला आहे.