प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने कोरोना लसीकरण प्रक्रियेसाठी तयारी पूर्ण झाली आहे. शनिवार 16 जानेवारीला शहरातील सावित्रीबाई फुले हॉस्पीटल, पंचगंगा हॉस्पीटल, महाडीक माळ, राजारामपूरी व सदरबाजार या पाच नागरी आरोग्य केंद्रावर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्यात प्रंट लाईनवरील महापालिका कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सरकारी व खासगी मिळून एकूण 11119 इतक्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी पोर्टलवर झालेली आहे.
आढावा बैठकीत तयारीची माहिती
दरम्यान, शुक्रवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेत माजी पदाधिकाऱयांची बैठक घेतली. यामध्ये कोरोना लसीकरण व सद्यःस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. कोविड-19 लसीकरण मोहिम तयारीबाबत स्लाईड शोद्वारे डॉ.अमोल माने यांनी सादरीकरण केले. यावेळी माजी महापौर हसीना फरास, निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजस मोहिते, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी परिवहन समिती सभापती चंद्रकांत सुर्यवंशी, माजी महिला बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, माजी गटनेते सत्यजित कदम, शारगंधर देशमुख, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, प्रशासकीय वैद्यकिय अधिकारी डॉ.विजय मुसळे, नगरसचिव सुनिल बिद्रे आदी उपस्थित होते.
शहरात कोरोना रिकव्हरी रेट 96.38 टक्के
सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे यांनी प्रथम सध्या शहरातील कोविडची सद्यःस्थिती सांगितली. शहरामध्ये मार्च 2020 पासून आत्तापर्यंत 12861 रुग्ण आत्तापर्यंत आढळून आले आहेत. त्यातील 12396 रुग्ण बरे झाले आहेत. ऍक्टीव्ह रुग्ण 38 असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत कोविडमुळे 427 जणांचा मृत्यू झालेला आहे. शहराचा रिकव्हरी रेट 96.38 टक्के आहे. सध्या घेण्यात येणाया टेस्ट व त्यामध्ये आढळून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 1 टक्का आहे.
रूग्ण आढळणाऱ्या भागात तातडीने सर्व्हे करा : प्रशासक डॉ. बलकवडे
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सध्या ज्या ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत. त्या भागाचा सर्व्हे जलदगतीने करुन घ्यावा. याठिकाणी जादा कर्मचारी नेमून सर्व्हे करावा, अशा सूचना आरोग्याधिकारी यांना दिल्या.
स्वॅब वाढविण्याच्या सूचना
उपआयुक्त निखील मोरे यांनी महापालिकेच्यावतीने दैनंदिन 500 स्वॅब घेतले जातात. स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढविण्याबाबत आरोग्य विभागाला सुचना दिल्या असल्याचे या आढावा बैठकीत सांगितले.
लसीकरणावर एक दृष्टीक्षेप
शहरातील केंद्रे : सावित्रीबाई फुले हॉस्पीटल, पंचगंगा हॉस्पीटल, महाडीक माळ, राजारामपूरी व सदरबाजार
वेळ : सकाळी 9 ते सायंकाळी 5
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा डोस
पहिल्या टप्प्यात डोससाठी पोर्टलवर नेंदणी केलेले कर्मचारी : 11119