महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आपल्या सहकाऱ्यांकडे ‘काय द्याचे बोला’ची भाषा : माजी गटनेते शारंगधर देशमुख यांचा गंभीर आरोप प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली तक्रार
प्रतिनिधी / कोल्हापूर
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिले मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेतीलच काही कर्मचारी जाणीवपूर्वक मेडिकल बिल काढताना आपल्याच संस्थेतील सहकाऱ्यांकडे `काय’ द्याचे बोला’ अशा पद्धतीची भाषा करत आडवणूक करत असल्याचा गंभीर आरोप महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी केला आहे.
माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुख, ताराराणी आघाडीचे माजी गटनेते सत्यजित उर्फ नाना कदम यांनी शुक्रवारी महापालिकेत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. यावेळी कोविड संदर्भातही या माजी पदाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या. तसेच शहरातील प्रश्नांवरही चर्चा झाली.
शारंगधर देशमुख यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलासंदर्भात सध्या येत असलेल्या तक्रारी प्रशासक डॉ. बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. ते म्हणाले, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मेडिकल बिल काढताना महापालिकेचेच कर्मचारी जाणीवपूर्वक आडवणूक करत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बिल काढण्यासाठी फेऱ्या माराव्या लागत आहे. काही आर्थिक अपेक्षा पूर्ण होत नसल्यानेच बिल काढण्यास उशिरा केला जात असल्याच्या तक्रारी माजी लोकप्रतिनिधी म्हणून कर्मचारी आमच्याकडे करत आहेत. प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी. देशमुख यांच्या तक्रारीनंतर प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे यांना या प्रकाराबद्दल माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.