उर्दू महाविद्यालयांना अल्पसंख्यांक दर्जा
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य शासन आणि युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. सचिवपदी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डॉ. डी. जी. कणसे समितीने दिलेल्या अहवालानुसार महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. महाविद्यालयांनी 80 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घ्यावी यासंदर्भात अभ्यास मंडळाने निर्णय घेण्यास मान्यता. राष्ट्रीय विज्ञान व गणीत दिन साजरा करण्यास मान्यता. विद्यापीठ परिक्षेत्रातील हुपरी येथील उर्दू महाविद्यालयाला अल्पसंख्यांक दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2020-21चे सुधारीत अंदाजपत्रक आणि शैक्षणिक वर्ष 2021-22 चे वार्षिक अंदाजपत्रक अधिसभेत सादर करण्यास मान्यता.
हे वार्षिक अंदाजपत्रक ऍड. धैर्यशील पाटील सादर करणार आहेत. शिवजी विद्यापीठातील डॉ. प्रदिप भास्कर एआयसीटीमध्ये सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आणखी एक वर्षाची वाढीव मुदत देण्यात आली. बांधकाम समितीचा अहवाल मान्य करण्यात आला. असे एकूण 30 विषय व्यवस्थापन परिषदेत मान्य करण्यात आले.
विद्यापीठ परिसरात झळकणार जैवविविधतेची छायाचित्रे
शिवाजी विद्यापीठ परिसरातील जैवविविधता, प्राणी, पक्षांची छायाचित्रे प्राणीशास्त्र विभागातील डॉ. ए. डी. जाधव यांनी टिपली आहेत. ही छायाचित्रे विद्यापीठ परिसरात दर्शनी भागात लावून परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या छायाचित्रांवर संबंधीत वनस्पती, पक्षाच्या माहितीसाठी बारकोड दिला जाणार आहे. या बारकोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह विद्यापीठात येणाऱया प्रत्येक व्यक्तीला संबंधीत छायाचित्राची माहिती मिळेल.