मायक्रो फायनान्स कंपन्यांना गृह राज्यमंत्र्यांचा इशारा
तक्रारीसाठी 18001021080 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीबाबत रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, ग्राहकांकडून सक्तीने वसुली कराल तर याद राखा, असा खणखणीत इशारा गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिला. सक्तीचा प्रयत्न झाल्यास ग्राहकांनी 18001021080 वर निर्भयपणे तक्रार करावी, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले आहे. पालकमंत्र्यांच्या या कणखर भूमिकेमुळे बचत गटातील कर्जदार महिलांना दिलासा मिळाला आहे.
सध्याच्या कोविड -19 महामारीच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात आले आहे. शासनाकडून मदतीच्या उपाय योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. अनेक संस्था, बँकांना कर्ज वसुलीची सक्ती करु नये असे शासनाने आवाहन केले आहे. मात्र मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीने वसुली होत असल्याच्या काही ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या व्याज दर, विविध शुल्क व दंड तसेच अन्य तक्रारी असतील तर त्यांनी 18001021080 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ही सुविधा मराठी भाषेत असल्याने ग्राहकांनी यावर तक्रारी दाखल कराव्यात, असे पालकमंत्री पाटील यांनी आवाहन केले आहे.