प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या कोविड हॉस्पिटलात उपचार घेऊन निगेटिव्ह झालेला रूग्ण पुन्हा पॉझिटिव्ह झाल्यामुळे काल रविवारी सकाळी पुन्हा कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. हा रूग्ण बोर्डा-फातोर्डा येथील रहिवासी आहे. कोविडचा उपचार घेतल्यानंतर अनेक जण निगेटिव्ह होऊन घरी जातात. पण, ते पुन्हा पॉझिटिव्ह होण्याचा धोका असतो व तो या रूग्णामुळे खरा ठरलेला आहे.
कोविड हॉस्पिटलच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे, बोर्डा-फातोर्डा येथील या रूग्णाला सात दिवसांपूर्वी कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण, सात दिवसानंतर पुन्हा तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे त्याला कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. सद्या कोविड हॉस्पिटलमधून 65 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यातील एकच रूग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे.
दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये 137 जणांवर उपचार सुरू आहेत. काल दिवसभरात केवळ दोनच रूग्ण या ठिकाणी दाखल झाले होते. त्यात एका कदंबाच्या कंडक्टरचा समावेश होता. सद्या कोविड हॉस्पिटल रूग्णांनी भरल्याने या इस्पितळातील अतिरिक्त जागा वापरण्यास सुरवात झालेली आहे. ज्या ठिकाणी हॉस्पिटलचे कर्मचारी बसायचे ती जागा तसेच स्त्राrयासाठीचा वार्ड ही वापरात आणला आहे.
मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये आत्ता केवळ सिम्प्टमैटिक रूग्णांनाच दाखल केले जाणार आहेत. तर असिम्प्टमैटिक रूग्णांना शिरोडा आरोग्य केंद्रात दाखल केले जाणार आहे. त्यामुळे कोविड हॉस्पिटलवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.