रशियाच्या राष्ट्रपतींची अमेरिकेला धमकी : क्यूबा संकटाची होणार पुनरावृत्ती
वृत्तसंस्था/ मॉस्को
युक्रेनवरून अमेरिकेसह नाटो देश आणि रशिया यांच्यातील तणावाला आता नवे वळण मिळत असल्याचे दिसून येत आहे. दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएला आणि क्यूबामध्ये सैन्य तैनात करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे संकेत रशियाकडून देण्यात आले आहेत. रशियाच्या या इशाऱयानंतर शीतयुद्ध काळात निर्माण झालेल्या क्यूबा संकटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सोव्हिएत संघाने क्युबामध्ये स्वतःची आण्विक क्षेपणास्त्रs तैनात केली होती. अमेरिकेपासून केवळ 145 किलोमीटर अंतरावर ही क्षेपणास्त्रs तैनात करण्यात आल्याने तणाव मोठय़ा प्रमाणात वाढला होता.
युक्रेनवरून पाश्चिमात्य देशांसोबत सुरू असलेल्या चढाओढीत रशियाने अखेर आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेसोबतचा तणाव वाढल्यास क्यूबा आणि व्हेनेझुएलात रशियाचे सैन्य तैनात करण्याची शक्यता फेटाळली जाऊ शकत नाही असे रशियाचे उपविदेशमंत्री सर्जेई रियाबकोव्ह यांनी म्हटले आहे.
जिनिव्हामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यात चर्चा सुरू आहे. नाटो-रशियाच्या बैठकीत युक्रेननजीक रशियाच्या सैन्य तैनातीदरम्यान त्याच्या सुरक्षा विषयक मागण्यांवरून निर्माण झालेले मतभेद दूर करण्यास यश आले नाही. रशियाने एकीकडे नाटोचा विस्तार रोखण्याची मागणी केली, तर अमेरिकेने या मागण्यांना फेटाळून लावले आहे. अमेरिकेने रशियाला चिथावणी दिल्यास किंवा सैन्य दबाव निर्माण केल्यास रशिया देखील सैन्य तसेच तांत्रिक पाऊल उचलू शकतो असा इशारा ब्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे.