वार्ताहर / कुंडल
क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापुंच्या स्मारकातून त्यांच्या जाज्वल्य इतिहासाचे दर्शन घडेल असे मत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केले. ते कुंडल ( ता.पलूस ) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी.बापू लाड यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी डॉ.चौधरी यांनी झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. आमदार अरुण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, श्रीकांत लाड, प्रांताधिकारी गणेश मरकड आदी उपस्थित होते.
डॉ. चौधरी म्हणाले, बापूंच्या कार्याची महती पुढील पिढीला कळावी म्हणून क्रांती कारखान्याने स्मारकासाठी ६० गुंठे जमीन दिली असून शासनाने ४ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी देऊन हे स्मारक उभे करण्याचा संकल्प सोडला. आमदार अरुण लाड याबाबत माहिती देताना म्हणाले, २५० लोकांची बैठकीसह प्रशस्त हॉल, साउंड सिस्टम, बापूंच्या कार्याचा जीवनपट, ग्रंथालय, बगीचा, विद्यूत रोषणाई करण्यात आलेली आहे. या स्मारकामुळे कुंडलच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
डॉ. चौधरी यांनी बापूंच्या समाधीस्थळास भेट देऊन कारखान्याकडून सुरु असलेल्या समाधी स्थळाच्या कामाची पाहणी केली. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मारकामध्ये चबुतर्यावर शासनाकडून अद्याप नाना पाटील यांचा पुतळा बसवण्यात आला नाही त्यासाठी प्रयत्न करण्याचीही मागणी आमदार अरुण लाड यांनी केली.