देशभरातील निवडक साडय़ा, चांदीच्या दागिन्यांचे प्रदर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
डॉ. अनुपमा जोशी आयोजित ‘क्रिएटिव्ह सोल्स, सिक्स यार्ड्स ऑफ एलिगन्स’ या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. खासदार मंगला अंगडी व डॉ. आसावरी संत यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनानंतर बोलताना डॉ. आसावरी संत म्हणाल्या, महिला उद्योजकांना या प्रदर्शनामुळे व्यासपीठ मिळाले आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करण्यास हे प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल. खासदार मंगला अंगडी यांनीही प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिल्यानंतर आयोजिका डॉ. अनुपमा जोशी म्हणाल्या, बेळगावच्या महिलांनी कोविडची मरगळ झटकून उद्योग वाढीसाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. आपल्या पसंतीच्या साडय़ा, ब्लाऊज, दागिने खरेदी करावेत, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी मेस्मेरायझिंग सिल्व्हरच्या संचालिका शुभांगी जिनगौडा यांचा डॉ. जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रदर्शनात देशभरातील निवडक साडय़ा व चांदीच्या दागिन्यांचे हॉटेल युके-27 येथे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. आर्ट सिल्क, पेप सिल्क, शिफॉन जॉर्जेट, कलमकारी, टसर, मटका सिल्क, महेश्वरी चंदेरी, अजरक, पटोला, मसलीन, काथा, लेनिन, कोटा, कांजीवरम, अरनी सिल्क, इक्कत, पैठणी, रवण, कसुरी, सुती अशा भारतातील विविध प्रांतातील निवडक आणि वैशिष्टय़पूर्ण साडय़ा, डिझाईन ब्लाऊज, साडी बेल्ट इत्यादी थेट विणकरांकडून एका छताखाली उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन केले. या प्रदर्शनात सर्व वस्त्रप्रावरणांवर शोभतील अशा शुद्ध चांदीच्या दागिन्यांचे स्टॉलही उपलब्ध आहेत. प्रदर्शन शनिवार दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत सर्वांसाठी खुले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.