वृत्तसंस्था/ सिडनी
अष्टपेलू कॅमेरॉन ग्रीनला पहिल्यांदाच क्रिकेट ऑस्ट्रेलियाबरोबर मध्यवर्ती करार करण्याची संधी मिळाली आहे तर ऑस्ट्रेलियाचे नवोदित क्रिकेटपटू पुकोवस्की तसेच अनुभवी मॅथ्यू वेड, टेविस हेड, मिचेल मार्श आणि स्टोईनिस यांना मात्र मध्यवर्ती करारातून वगळण्यात आले आहे.
2020-21 च्या क्रिकेट हंगामासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 17 क्रिकेटपटूंशी मध्यवर्ती करार केला आहे. या क्रिकेट हंगामाच्या कालावधीत भारतातील आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि पुढील वर्षीच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियात होणाऱया ऍशेस मालिकेचा समावेश आहे.
21 वर्षीय अष्टपैलू ग्रीनने गेल्या वर्षीच्या क्रिकेट हंगामात ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाकडून खेळताना भारताविरुद्ध 4 कसोटी सामने खेळले होते. कॅमेरॉनची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी सातत्याने चांगली होत असल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कॅमेरॉन हा भविष्यकाळातील महत्त्वाचा खेळाडू असल्याने त्याच्याबरोबर मध्यवर्ती करार करण्याचा निर्णय घेतला. सिडनीत भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातील दुसऱया डावात ग्रीनने 84 धावांची केलेल्या खेळीने ऑस्ट्रेलियन निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. 23 वर्षीय नवोदित पुकोवस्कीने भारताविरुद्धच्या मालिकेत आपले कसोटी पदार्पण केले होते पण त्याला मध्यवर्ती करारासाठी वगळण्यात आले. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे अनुभवी क्रिकेटपटू मॅथ्यू वेड, हेड, मिचेल मार्श आणि स्टोईनिस यांनाही मध्यवर्ती करारापासून वंचित व्हावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने विंडीजचा कमी कालावधीचा दौरा आयोजित केला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकचा दौराही करणार आहे.
सीएने करारबद्ध केलेले क्रिकेटपटू- ऍगर, कॅरे, पॅट कमिन्स, फिंच, कॅमेरॉन ग्रीन, हॅझलवूड, लाबुशाने, लेऑन, मॅक्सवेल, टीम पेन, जेम्स पॅटिन्सन, जे. रिचर्डसन, के. रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेविड वॉर्नर आणि ऍडम झांपा.