इरफान-युसुफकडून10 हजार किलो तांदूळ व 700 किलो बटाटे दान, गोपीचंद, युवराज, हरभजन सिंगचाही पुढाकार
वृत्तसंस्था/ वडोदरा
संपूर्ण देशभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी समाजातील अनेक क्षेत्रातून लोक पुढाकार घेत आहेत. देशातील आजी-माजी खेळाडूंसह, नामांकित क्रिकेटपटू, महत्वपूर्ण अशा क्रीडा संघटना देखील मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीला मदत करत आहेत. टीम इंडियाचे माजी खेळाडू इरफान आणि युसूफ पठाण यांनी गरजू व्यक्तीसाठी अन्नधान्याची सोय केले. वडोदरा येथील गरजूंसाठी तब्बल 10 हजार किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे पठाण बंधूंनी दान केले आहेत. .
वडोदरा येथे काही दिवसापूर्वी पठाण बंधूंनी मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले होते. आता, या लॉकडाऊनमधील कठीण काळात काही गरजू लोकांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे समजताच त्यांनी तब्बल 10 हजार किलो तांदुळ व 700 किलो बटाटे दान केले आहेत. सध्याच्या या काळात सरकारला ज्या पद्धतीच्या मदतीची गरज आहे ती मदत करायला आम्ही तयार आहोत. पुढचे काही दिवस खडतर असणार आहेत, यामुळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. हे सारे अन्नधान्य वडोदरा प्रशासनातर्फे गरजू लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. पठाण बंधूंव्यतिरीक्त बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, बॉक्सर मेरी कोम, हिमा दास, बजरंग पुनिया यासारख्या खेळाडूंनी मदतकार्यात सहभाग घेतला आहे.