कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूर, सिंधुदूर्गसह राज्याच्या एकुणच क्रीडा विकासात मोलाचा वाटा उचलत खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटना व क्रीडा संघटकांमध्ये प्रतिष्ठा मिळवलेले अधिकारी आणि कामांच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात एक जाणकार नावारुपाला आलेले पुण्यातील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे (पुणे) सेवानिवृत्त सहसंचालक नरेंद्र मन्मत सोपल (वय 61, रा. सांगली) यांचे मंगळवारी पहाटे मज्जारज्जूच्या विकाराने निधन झाले. माजी मंत्री दिलीप सोपल यांचे ते सख्खे चुलत भाऊ होत. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई व नातू असा परिवार आहे.
नरेंद्र सोपल यांचे मुळगाव बार्शी (जि. सोलापूर). ते 1986 साली सांगलीत स्थायिक झाले. दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली. ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची 1993 सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1999 साली त्यांची सिंधुदूर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून बदली केली. याचवेळी त्यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला होता. 2002 सालापर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. यानंतर पुन्हा त्यांची सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली. पुढील दोन वर्षानंतर त्यांना सहायक संचालक या पदाची बढती देऊन पुण्यातील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या कार्यालयाकडे बदली केली. त्यांनी क्रीडा विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्यावर 2006 साली कोल्हापूर विभागीय क्रीडा उपसंचालकपदाची जबाबदारी सोपवली. दरम्यानच्या काळात त्यांनी विविध क्रीडा संघटना व खेळाडूंचे विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.
राज्यातील हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी यांना शासनाकडून मानधन मिळावे, यासाठी शासन दरबारी पाठपुरावाही केला. 2008 साली त्यांना सहसंचालक पदाची बढती देऊन पुण्यातील कार्यालयाकडे बदली केली. सलग 11 वर्षे सहसंचालक म्हणून कार्यभार सांभाळताना त्यांनी राज्यातील क्रीडा विकासासाठी मोठे योगदान दिले. 2019 साली क्रीडा सहसंचालक या पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पार्थिवावर सांगलीतील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. माती सावडण्याचा विधी गुरुवारी (दि. 28) सकाळी साडे आठ वाजता आहे.