चित्रपटात प्रभास नायकाच्या भूमिकेत
अभिनेत्री क्रीति सेनॉनने स्वतःचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’चे चित्रिकरण पूर्ण केले आहे. यासंबंधीची माहिती तिनेच सोशल मीडियावर दिली आहे. आदिपुरुष चित्रपटात क्रीतिसोबत दक्षिणेतील सुपरस्टार प्रभास आणि सैफ अली खान दिसून येणार आहे. या चित्रपटात क्रीति जानकी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. क्रीतिने दिग्दर्शक ओम राऊतसोबतची छायाचित्रे शेअर केली आहेत.
हा प्रवास इतक्या लवकर संपला यावर विश्वासच बसत नाही. जानकी ही व्यक्तिरेखा साकारल्याचा मला गर्व आहे. तिचे प्रेमळ मन, पवित्र आत्मा आणि आत्मबळ कुठे न कुठे माझ्यामध्ये नेहमीच राहणार आहे. मला जानकी ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी देण्यासाठी आणि माझ्यावर विश्वास दाखविण्यासाठी राऊत यांचे आभार मानते. राऊत यांचा व्हिजन कमालीचा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना दाखविण्यासाठी मी फार काळ प्रतीक्षा करू शकत नाही. या चित्रपटाबद्दल मला नेहमीच गर्व राहणार असल्याचे क्रीतिने स्वतःच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
तसेच तिने प्रभास, सैफ अली खान आणि सनी सिंह यांचेही कौतुक केले आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदू महाकाव्य रामायणाने प्रेरित आहे. चित्रपटात आदिपुरुषाच्या भूमिकेत प्रभास तर सैफ अली खान मुख्य खलनायक ‘रावणा’ची भूमिका साकारत आहे. चित्रपटात देवदत्त नागे आणि सनी सिंहही झळकणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.