चेन्नई / वृत्तसंस्था
हिंदू धार्मिक आणि सेवाभावी संस्थेने आपली विविध पदे भरण्यासाठी केलेल्या जाहिरातीमुळे तामिळनाडूत वाद निर्माण झाला आहे. ही पदे केवळ हिंदूंसाठी आहेत. त्यामुळे हिंदू धर्माच्या इच्छुकांनीच आवेदने सादर करावीत, असे जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले आहे. ही जाहिरात 13 ऑक्टोबरची आहे.
या संस्थेच्या अरुलमिगू कपलीश्वरर आर्टस् अँड सायन्स महाविद्यालयाच्या वतीने ही जाहीरात देण्यात आली आहे. बी. कॉम. बीबीए, बीएसी काँप्युटर सायन्स, बीसीए, तामिळ, इंग्रजी, गणित, शारीरिक शिक्षण इत्यादी विषय शिकविणाऱया प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात देण्यात आली आहे.
राज्यातील काही धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱया संघटनांनी या जाहिरातीला आणि संस्थेच्या धोरणांना आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारे धार्मिक पातळीवर पक्षपात करता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे समाजात दुफळी माजण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तथापि, अद्याप राज्य सरकारने यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नसल्याचे समजते.