घटत्या लोकसंख्येच्या संकटावर नवा उपाय
15 वर्षांचा करार अनिवार्य
सर्वसाधारणपणे भारतात एका छोटय़ा घराची किंमत 10 ते 12 लाख रुपयांदरम्यान असते. पण क्रोएशियात 1500 चौरस फूटांची घरे केवळ 12 रुपयांमध्ये विकली जात आहेत. क्रोएशियाच्या उत्तर भागात लेग्राड हे शहर आहे. हे शहर 62 चौरस किलोमीटर क्षेत्रात फैलावलेले आहे. सर्वसाधारणपणे भारतात एवढय़ा मोठय़ा क्षेत्रात फैलावलेल्या शहराची लोकसंख्या लाखांमध्ये असते. पण लेग्राड शहरात सध्या केवळ 2241 लोकच राहत आहेत.
शहरात वाहतूक सुविधा नसल्यातच जमा आहे. पण शहरातील लोकसंख्या कमी होऊ नये म्हणून रिकामी घरांना एक कुनामध्ये (सुमारे 12 रुपये) विकण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 17 घरांची विक्री झाली आहे. पण खरेदीदारांना कराराच्या अंतर्गतच घरे विकण्यात येत आहे. यानुसार खरेदीदारांना किमान 15 वर्षांपर्यंत शहरात रहावे लागणार असल्याचे लेग्राडचे महापौर इवान साबोलिक यांनी सांगितले आहे.
लेग्राडची सीमा हंगेरीला लागून आहे. चहुबाजूला जंगल आहे. सुमारे 100 वर्षांपूर्वी एस्ट्रो आणि हंगेरियन साम्राज्य मोडीत निघाल्यावर येथील लोकसंख्या कमी होऊ लागली आहे. अलिकडेच 19 कुटुंबांनी घरदार सोडून राजधानी जाग्रेब येथे स्थलांतर केले आहे. यातील काही घरं मोडकळीस आली आहेत. जर कुणी ही घरं विकत घेऊ इच्छिल्यास प्रशासन त्यांची दुरुस्ती करून देणार आहे. याचबरोबर तेथे नव्याने जीवन सुरू करण्यासाठी 35 हजार कुना (सुमारे 3 लाख रुपये) देखील देण्यात येतील असे इवान यांनी म्हटले आहे.
ही घरं मोफत मिळाल्यासारखीच आहेत. लोक येथे येतात, पण काही काळानंतर घर सोडून जातात. याचमुळे घर खरेदी करणाऱयांना 15 वर्षांचा करार करावा लागणार आहे, जेणेकरून लोकांनी येथे रहावे आणि शहर लोकांनी भरलेले दिसावे असे महापौर इवान म्हणाले.