नगराध्यक्षा माधवी कदम यांची पत्रकाद्वारे माहिती
प्रतिनिधी/ सातारा
शिवशाही अपार्टमेंटच्या भिंतीचे काम केले नाही. म्हणून ठेकेदारास गळा कापून टाकण्याची व पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना शिव्यांची लाखोली फोनवरुन त्याच ठेकेदाराला देणाऱया बांधकाम सभापती सिद्धी पवार यांच्या शनिवारी सायंकाळी राजनीम्याच्या पत्राने चांगलीच खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे सातारकरांना वाटले की बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी बांधकाम सभापतीपदाचा राजीनामा दिला गेला आहे. मात्र, आज नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी पत्रक काढून सिद्धी पवार यांचा कथीत राजीनामा माझ्याकडे आला नाही असे जाहीर केले.
मार्च महिन्यापासून सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार या आक्रमक मुडमध्ये आहेत. त्यांनी तेव्हा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यावर तोंडसुख घेतले होते. त्यावेळी पत्रकबाजी झाली होती. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा सिद्धी पवार चर्चेत चांगल्याच येवू लागल्या. त्यांनी एका ठेकेदारास फोनवरुन काम होत नसल्याच्या कारणावरुन चिडून जावून शिवीगाळ केली त्याचवेळी त्यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनाही शिवीगाळ केल्याचे त्या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख असल्याने दोन दिवसांपासून चांगलाच गदारोळ सुरु आहे. शनिवारी सिद्दी पवार यांच्या राजीनाम्याच्या पत्राने पुन्हा खळबळ उडवून दिली. पत्र बारकाईन पाहिले तर ते जुन्या तारखेचे होते त्यामुळे रविवारी पालिकेच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पत्रक काढुन त्या म्हणाल्या, सिद्धी पवार यांचा कथित राजीनामा माझ्यापर्यंत आलेला नाही. जेव्हा येईल तेव्हा पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिद्धी पवार यांच्या राजीनामा अस्त्राचे गुढ नेमके काय अशीच चर्चा आता रंगू लागली आहे.