मायणी / प्रतिनिधी :
कायम दुष्काळ सहन करणाऱ्या खटाव तालुक्यात विस्तारलेल्या गावांचा विकास साधण्यासाठी गावठाण हद्द निश्चित होणे आवश्यक आहे. या तालुक्यात बहुतेक गावांचे अभिलेख नसल्याने जमिनीचे व्यवहार होताना अनेक अडचणी येतात. प्रसंगी वाद निर्माण होतात. यासाठी गावाच्या मालमत्तेचे सर्वेक्षण होऊन तालुक्यातील मालमत्तेचा मालकी हक्क मिळवण्याचा मार्ग खुला झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील 11 गावांचे प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू झाले असून, उरलेली 72 गावे पुढील महिन्यात सर्वेक्षणाखाली येणार आहेत. संबंधित योजना ग्राम विकास विभाग जमाबंदी आयुक्त कार्यालय भारतीय संरक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवण्यात येणार असल्याचे उपाधिक्षक प्रतापराव पवार यांनी सांगितले. तसेच आधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा वापर करून गावातील सर्व मिळकतदारांच्या मिळकतीचे मोजमाप करून नकाशा तसेच मिळकत पत्रिका तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शासनाच्या मिळकतीचे सर्वेक्षण होणार आहे. ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संरक्षण होऊन गावोगावी असणाऱ्या अतिक्रमणापासून मोकळा श्वास मिळणार आहे.