प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले आहेत. परिसरात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. याबाबत कॅन्टोन्मेंटकडे तक्रार करण्यात आल्याने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले.
अवजड वाहनांना शहरात बंदी घातल्यानंतर काही वाहनांची वर्दळ कॅम्प परिसरातील रस्त्यांवर वाढली आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या गोडाऊनला जाणाऱया वाहनांची गर्दी या रस्त्यावरुन होत आहे. विशेषता मिलिटरी महादेव क्रॉसहून शौर्य चौकला जाणाऱया आसदखान दर्ग्यासमोरील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच अन्य मार्गावरही वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे हा रस्ता देखील पूर्णपणे खराब झाला आहे. खड्डेमय रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या परिसरात विविध शाळा असल्याने पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांना खड्डय़ांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेऊन आसदखान दर्गा परिसरातील रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे कॅन्टोन्मेंटच्यावतीने बुजविण्यात आले. सध्या खडी आणि माती घालून हे खड्डे बुजविण्यात आले. तात्पुरते दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.