पाच वर्षांपूर्वी अडकला होता बेळगाव पोलिसांच्या जाळय़ात
प्रतिनिधी/ बेळगाव
भरदिवसा घरफोडय़ा करणाऱया आंतरराज्य टोळीतील खतरनाक प्रकाश पाटील (वय 30, मूळचा रा. सरस्वती रोड, शहापूर, सध्या रा. साखळी गोवा) हा पाच वर्षांपूर्वी बेळगाव पोलिसांच्या जाळय़ात अडकला होता. या पाच वर्षात त्याने अनेक गुन्हे केले असून डिसेंबर महिन्यातच त्याला अटक झाली होती.
8 डिसेंबर 2015 रोजी बेळगाव ग्रामीण व काकती पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करुन प्रकाश पाटील व त्याचा आणखी एक साथीदार अजित शिवराय धनगर (वय 25, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) या दोघा जणांना अटक केली होती. या जोडगोळीने बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 8 व काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 9 अशा एकूण 17 घरफोडय़ांचा तपास लागला होता.
त्यावेळी पोलिसांनी 400 ग्रॅम सोने व दीड किलो चांदीचे दागिने जप्त केले होते. त्यानंतर पाच वर्षांनी खतरनाक प्रकाश पाटील हा आंतरराज्य गुन्हेगार पुन्हा बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या जाळय़ात अडकला आहे. गेल्या रविवारी 6 डिसेंबर रोजी भर दिवसा झाडशहापूर येथे घरफोडी करताना थरारक पाठलाग करत स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी प्रकाशसह दोघा जणांना अटक केली आहे.
6 डिसेंबर रोजी त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्दितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर 8 डिसेंबर 2020 रोजी त्याला पोलीस कोठडीत घेण्यात आले. पाच वर्षांपूर्वीही तो 8 डिसेंबर 2015 रोजी बेळगाव पोलिसांच्या जाळय़ात अडकला होता. त्यामुळे तारीख आणि महिना यातील साम्य योगायोग आहे की आणखी काही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता प्रकाश समवेत त्याचा साथीदार बदलला आहे. निथाई खालीपद मंडल (वय 41, रा. पश्चिम बंगाल) यालाही अटक झाली आहे. गुरूवारी 17 डिसेंबर रोजी या दोघा जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्दितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी या जोडगोळीकडून एक होंडाई क्रेटा कार, 848 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक गावठी पिस्तुल, पाच जीवंत काडतुसे असे एकूण 51 लाख 60 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. एका गुह्यातून सुटका झाली की परत घरफोडय़ा करणे हाच त्याचा धंदा आहे.
कायद्याचेही आहे ज्ञान
प्रकाश पाटील हा मुळचा बेळगावचा असला तरी सध्या सहकुटुंब तो गोव्यात राहतो. दिवसा घरफोडय़ा करण्यात त्याचा हातखंडा आहे. पळून जाण्यासाठी मार्ग शोधूनच तो घरफोडीसाठी तयार होतो. पाठिमागील दरवाजा फोडून घरात प्रवेश करतो. त्याच्या जवळ कडीकोयंडा व तिजोरी फोडण्यासाठी अनेक अवजारेही असतात. पोलिसांना हातांच्या ठस्यांचे नमुने मिळू नये यासाठी हात मोजे घालूनच तो चोरी करतो. खास करुन दिवसा घरफोडय़ा करुन कारमधून गोव्याला निघून जाणाऱया प्रकाशला कायद्याचेही ज्ञान आहे. चोऱया, घरफोडय़ा प्रकरणात अटक झाल्यानंतर कारागृहात तो कायद्याची पुस्तके वाचतो, अशी माहिती मिळाली आहे.