सेन्सेक्समध्ये 230 अंकांची तर निफ्टीत 63 अंकांची तेजी- अदानी पोर्टस् सर्वाधिक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात सलग दोन दिवस होत असलेली घसरण अखेर सोमवारी थांबली आहे. बीएसई सेन्सेक्स 230 अंकांच्या वाढीसह आणि निफ्टी निर्देशांक 63 अंकांच्या वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाला.
भारतीय शेअर बाजारात सुरूवातीला आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव दिसून आला. सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 230 अंकांच्या वाढीसह 52,574 अंकांवर आणि एनएसई निफ्टी निर्देशांक 63 अंकांच्या वाढीसह 15,746 अंकांवर बंद झाला. निफ्टीत 50 पैकी 36 समभाग हे वाढीसह बंद झाले तर सेन्सेक्समधील 30 पैकी 22 समभाग तेजीसह बंद झाले आहेत. भारतीय शेअर बाजारात सोमवारी विक्रीचा जोर दिसला. मागच्या तुलनेत सेन्सेक्स जवळपास 600 अंकांच्या घटीसह सोमवारी खुला झाला. निफ्टीही 150 अंकांच्या घसरणीसह खुला झाला होता. म्हणजेच सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकांनी सकाळीच खराब सुरूवात केली. जागतिक शेअर बाजारात विक्रीला वेग आल्याने आयसीआयसीआय बँक, एसबीआय आणि एल अँड टी यांच्या समभागात घसरण दिसून आली. पण नंतर सेन्सेक्स 52,100 व निफ्टी 15,600 अंकांवर व्यवहार करत होता. सोमवारी सलग तिसऱया दिवशी शेअर बाजार कमकुवत सुरुवात करू शकला. निफ्टी आयटी निर्देशांक 1 टक्के घसरण नोंदवत होता. सुरूवातीला निफ्टीतील बँक निर्देशांक घसरणीत होता. ऑटो, वित्त सेवा, फार्मा, धातू व ऊर्जा क्षेत्रातील निर्देशांकही कमकुवत दिसून आले. निफ्टीत मीडिया, रियल्टी व एफएमसीजी क्षेत्राने मात्र बाजाराला आधार दिला. दुपारी दीडच्या दरम्यान शेअर बाजार बऱयापैकी सावरताना दिसला. सेन्सेक्स त्यावेळी 33अंकांच्या वाढीसह 52,377 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 15,690 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टीत अदानी पोर्टचे समभाग 6 टक्के वाढीसह तर अदानी पॉवरचा समभागही 4 टक्के उसळीसह व्यवहार करत होता.
आंतरराष्ट्रीय बाजारांचा विचार करता, जपानचा निक्केई निर्देशांक 3 टक्के घसरला होता. हाँगकाँगचा हँगसेंग 1 टक्के घसरणीत होता. कोरियाचा कोस्पी देखील दबावात होता. चीनचा शांघाईही काहीशी घसरण नोंदवत होता. 18 जूनला विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2680 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.