ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये खराब हवामानामुळे 100 किलोमीटर ‘क्रॉस-कंट्री पर्वतीय मॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या 21 स्पर्धकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चीनच्या शिन्हुआ या वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे.
चीनच्या गांसु प्रांतात पर्यटन स्थळ असलेल्या ‘यल्लो रिव्हर स्टोन’ फॉरेस्टमध्ये आयोजित 100 किलोमीटर क्रॉस-कंट्री पर्वतीय मॅरेथॉनमध्ये 172 जण सहभागी झाले होते. दरम्यान, मॅरेथॉन मार्गावरील उंच भागातील 20 ते 31 किमी अंतरादरम्यानचे हवामान खराब झाले. या स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना वेगवान वारे आणि हिम वर्षावाचा सामना करावा लागला. तापमान अचानकपणे कमी झाल्याने अनेक स्पर्धकांना त्रास झाला. काही जण बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यावर ही स्पर्धा थांबविण्यात आली. बेपत्ता झालेल्या स्पर्धकांचा शोध घेण्यासाठी 1200 हून अधिक मदत आणि बचाव कार्याचे कर्मचारी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने काम करत आहेत.
या स्पर्धेतील 172 स्पर्धकांपैकी 143 जण सुरक्षित आहेत. 8 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर 21 स्पर्धक दगावले आहेत.