मागील चार वर्षांतील विक्रमी आकडेवारी : विमा प्रतिनिधींकडून सहकार्य
प्रतिनिधी / ओरोस:
खरीप हंगामासाठीच्या पिक विमा योजनेत गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तिप्पट शेतकरी सहभागी झाले आहेत. गतवर्षी 760 शेतकऱयांनी या योजनेत सहभाग घेतला होता. तर यावर्षी 2512 शेतकऱयांनी विमा हप्ता भरला आहे. खरीप हंगाम विमा योजना सुरू झाल्यापासूनचा हा सर्वाधिक आकडा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. तर विमा कंपनीने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींनी चांगले सहकार्य दिल्याची प्रतिक्रिया शेतकऱयांकडून व्यक्त होत आहे.
नैसर्गिक, आपत्ती कीड रोग यासारख्या प्रतिकुल परिस्थितीत खरीप हंगामातील भात व नागली पिकाचे नुकसान झाल्यास विमा संरक्षणाच्या माध्यमातून शेतकऱयांना नुकसान भरपाई देता यावी. त्याचप्रमाणे त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने शासनाकडून ही योजना 2015-16 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान ही योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीतील हा विक्रमी सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
गतवर्षीपर्यंत ही योजना कर्जदार शेतकऱयांसाठी बंधनकारक होती. तर बिगर कर्जदार शेतकऱयांसाठी मात्र ती ऐच्छिक स्वरुपाची होती. यावर्षी निकषात बदल करीत शासनाने कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱयांसाठी ती ऐच्छिक असल्याचे जाहीर केले आहे. ऐच्छिकतेची संधी दिली गेल्याने यामध्ये सहभागी होणाऱया शेतकऱयांच्या संख्येबाबत ‘जर-तर’ ची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र यावेळी विक्रमी सहभाग झाल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षी भात पिकाच्या 313 कर्जदार शेतकऱयांनी 131.96 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. बिगर कर्जदार 436 शेतकऱयांनी 88.24 हेक्टर, तर नागलीच्या 11 शेतकऱयांनी 1.14 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. यावर्षी 2512 शेतकऱयांनी 440 हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेतले आहे. 4 लाख 4 हजार रुपये विमा हप्ता भरण्यात आला असून नुकसान झाल्यास 2 कोटी 2 लाख रुपये विमा कंपनीकडून दिले जाणार आहेत.
शासनाने यावर्षी विमा कंपनी बदलली असून इफ्को टोकियो या विमा कंपनीची पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीने प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्हा स्तरावर एक, तर प्रत्येक तालुकास्तरावर एक असे एकूण नऊ विमा प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.
गतवर्षी विमा संरक्षित क्षेत्र
313 कर्जदार शेतकरी 131.96 हेक्टर
436 बिगर कर्जदार शेतकरी 88.24 हेक्टर
11 नागली शेतकरी 1.14 हेक्टर
यावर्षी विमा संरक्षित क्षेत्र
2512 शेतकरी 440 हेक्टर क्षेत्र
4.4 लाख रुपये विमा हप्ता
2.2 कोटी विमा संरक्षण