प्रतिनिधी/ गुहागर
लॉकडाऊन काळात अनेक कुटुंबांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गरजवंत कुटुंबांना गुहागर खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या एन.एस.एस. स्वयंसेवकांच्यावतीने जीवनावश्यक किराणा मालाची मदत करण्यात आली आहे.
प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांच्यासह सर्व प्राध्यापक व एन.एस.एस. स्वयंसेवक यांनी व्हॉटस्ऍप ग्रुप तयार करून ऑनलाईन पैशाच्या स्वरूपात मदत गोळा करण्यास सुरूवात केली. यामध्ये आजी-माजी विद्यार्थी, स्वयंसेवक, दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने 47,300 रूपये मदत निधी जमा झाला. यातून गरजूंकरिता किराणा साहित्याची खरेदी करून स्वयंसेवकांमार्फत पोहच करण्यात आली. चिखली, गुहागर, देवघर, पालशेत, सुरळ, वेळणेश्वर, शृंगारतळी, नरवण, वरवेली, पालपेणे येथील तब्बल 109 कुटुंबापर्यंत ही मदत पोहच करण्यात आली आहे.