वृत्तसंस्था/ दुबई
पाक महिला क्रिकेट संघाची कर्णधार सना मिर हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) सना मिरचे खास अभिनंदन केले आहे.
सना मिर हिने आपल्या कामगिरीच्या जोरावर पाक क्रिकेट क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. मिरच्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये कामगिरीत सातत्य पाहावयास मिळाले आहे. जागतिक महिला क्रिकेट क्षेत्रामध्ये सना मिर हिच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. सेना मिरने वनडे क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक बळी मिळविले असून पाकतर्फे अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे. सेना मिरने 2005 साली कराची येथे श्रीलंकेविरूद्ध आपले वनडे क्रिकेट पदार्पण केले होते तर तिने आपला शेवटचा वनडे सामनालाहोरमध्ये 2019 नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशविरूद्ध खेळला होता. पाकची ती अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखली जाते. वनडे क्रिकेटमध्ये बळींचे शतक आणि फलंदाजीत 1000 धावा जमविणारी सेना मिर ही पाचवी महिला क्रिकेटपटू आहे. आतापर्यंत पाच महिला क्रिकेटपटूंनी पराक्रम केला आहे. सेना मिरने 2009, 2013, 2017 च्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्याचप्रमाणे 2009, 2010, 2012, 2014, 2016 आणि 2018 अशा आयसीसीच्या महिलांच्या सहा टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे.