सांस्कृतिक प्रतिनिधी / फोंडा
गोमंतक संत मंडळ संचालीत फोंडा कीर्तन विद्यालय आयोजित एकदिवशीय कीर्तन संमेलनात बाल व युवा कीर्तनकारांनी बहारदार किर्तने सादर केली. चक्री किर्तनांच्या माध्यमातून विविध विषय श्रोत्यांसमोर मांडण्यात आले. खांडेपार येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या सहकार्याने रविवारी हे संमेलन देवस्थानच्या सभामंडपात आयोजित करण्यात आले होते.
संमेलनाचे उद्घाटन निवृत्त सनदी अधिकारी नारायण नावती यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलीत करुन करण्यात आले. देवस्थानचे सचिव मंदार खांडेपारकर, कीर्तन विद्यालयाचे प्राचार्य व प्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. सुहासबुवा वझे, सुर्यकांत देसाई आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. किर्तनाचे खऱया अर्थाने तरुण पिढीमध्ये बीजारोपण करण्याचे कार्य सुहासबुवा वझे यांनी केले. भक्तीच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणाऱया या प्राचिन कलेला सामाजिक व शासकीय संस्थाचा हातभार लागणे गरजेचे आहे, असे उद्गार नारायण नावती यांनी यावेळी बोलताना काढले.
संमेलनाची सुरुवात चक्री किर्तनाने झाली. पहिल्या सत्रात समीक्षा कुर्टीकर व संपूर्णा भगत यांनी कीर्तन सादर केले. त्यानंतर ‘कीर्तन संस्कार’ या विषयावर परिसंवाद झाला. दुपारच्या सत्रात डॉ. अश्लेषा पडते, ईश्वरी कांदोळकर व विष्णू भगत यांनी तर शेवटच्या सत्रात आरुषी जोशी, भक्ती वळवईकर, गायत्री कदम, सर्वेश साळगावकर, मैत्रेयी आमशेकर व ब्रह्मय सुर्लकर या बाल व युवा किर्तनकारांनी चक्री किर्तने सादर केले. त्यांना तबल्यावर साईराज केरकर व रुद्राक्ष वझे, हार्मोनियमवर महेश धामस्कर व सुहासबुवा वझे तर चिपळीसाथ दत्ता मावजेकर, दामोदर कामत आणि देवानंद सुर्लकर यांनी केली.
सुहासबुवा वझे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिवानी वझे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर दामोदर कामत यांनी आभार मानले.